अहमदनगर
स्वतःची प्रबळ इच्छा व कर्तुत्वावर महिला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात -सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे
महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
राहुरी विद्यापीठ : आज आपणा सर्वांना स्त्रिशक्तीचा जागर सर्व क्षेत्रात होत असलेला दिसून येत आहे. स्वतःच्या प्रबळ इच्छेने व कर्तुत्वाने महिला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात हे सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.बापूसाहेब भाकरे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील डॉ.अण्णासाहेब शिंदे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. बापूसाहेब भाकरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी नाशिक येथील व्याख्यात्या श्रीमती वंदना जाधव, हाळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाने, आंतरविद्या जलसिंचन विभाग प्रमुख तसेच कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, मेजर राजश्री लोखंडे, राहुरी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमुख ब्रह्मकुमारी नंदा बहनजी व मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका तथा उपकुलमंत्री डॉ. रितू ठाकरे यावेळी उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या श्रीमती वंदना जाधव यांनी व्यक्तिमत्व विकास व सर्वांगीण विकास, स्त्रियांचा समाजातील दर्जा व नारीशक्ती महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. श्रीमती वंदना जाधव यांनी आपल्या व्याख्यानातून स्त्रियांना स्वतःमध्ये असलेली शक्ती तसेच स्वतःची ओळख करून दिली. विद्यार्थी दशेमध्ये मेडिटेशनची असलेली गरज, मेडिटेशन करावयाच्या पद्धती समजून सांगत यावेळी मेडिटेशन करून घेतले. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी शांततेची शक्ती किती आवश्यक आहे हे पटवून दिले. उपस्थित विद्यार्थिनींनी अतिशय मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा लाभ घेतला.
यावेळी मेजर राजश्री लोखंडे यांनी त्यांचा आर्मीमध्ये असतानाचा अनुभव कथन केला. यावेळी आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की महिलांनी कुठल्याही कार्यक्षेत्रात काम करताना सकारात्मक असण्याबरोबरच स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगणे गरजेचे आहे तरच त्या क्षेत्रात त्या यशस्वी होऊ शकतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मोनिका गुंड व शुभांगी बोचरे यांनी केले तर आभार कु. केतकी अंधारे हिने मानले. या कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक श्रीमती कविता काकडे, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या तसेच आचार्य पदवीच्या विद्यार्थिनी तसेच हाळगाव कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व मध्यवर्ती परिसरातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.