अहमदनगर

राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा – आण्णा पाटील म्हसे

राहुरी | प्रतिनिधी : राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याबरोबरच बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसंदर्भात राहुरी नगरपरिषदेला निवेदन सादर केले.
यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आण्णा पाटील म्हसे म्हणाले की, राहुरी शहराजवळ शिर्डी व शिंगणापूर हे प्रसिद्ध देवस्थान आहेत. देश-विदेशातून येणारे भाविक-पर्यटक हे आपल्या राहुरी शहरातून प्रवास करत असतात. आपल्या शहरात कुठेही “छत्रपतींचे” स्मारक नाही. त्या अनुषंगाने राहुरी नगरपरिषदेने सुधारित पाणी पुरवठा योजने अंतर्गत नविन पाण्याची टाकी मुथ्था प्लॉट, डॉ.दादासाहेब तनपुरे मार्गावर बांधलेली आहे. जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी निष्कासित करणे अनिवार्य झालेले आहे. जुनी पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्या मोकळ्या जागेत “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करण्यात यावी.
तसेच राहुरी शहरात नगरपालिकेच्या वतीने मराठा भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मराठा भवन उपलब्ध झाल्यास समाजातील होतकरू विद्यार्थांसाठी अभ्यासिका केंद्र, वाचनालय, मार्गदर्शन शिबीर, बाहेर गावच्या विद्यार्थांना वस्तीगृह तसेच इतर समाज उपयोगी कार्यक्रम घेता येतील. तसेच राहुरी शहरात प्रवेश करताना जुन्या पाण्याच्या टाकी जवळ कॉलेज रोड, ब्लड बँक समोरील परिसरात राहुरी नगरपरिषदेच्या माध्यमातून सेल्फी पॉइंट तयार करण्यात येत आहे. सदर परिसराला नागरिकांनी अनेक वर्षांपासून “छत्रपती चौक” असे नामकरण केलेले आहे. होणाऱ्या सेल्फी पॉईंटच्या जवळ “छत्रपती चौक” असे राहुरी नगर परिषदेकडे अधिकृत दप्तरी नोंद करून विद्युत नाव  ( LED Borad ) बसवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. वरील विषय मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचे आण्णा पाटील म्हसे यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील, तालुका संघटक अशोक तनपुरे, शेतकरी आघाडी प्रमुख किशोर मोरे, मराठा संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र लबडे, मराठा समन्वयक सचिन चौधरी, विक्रम गाढे, प्रभाकर तुपे आदींचा समावेश होता.

Related Articles

Back to top button