कृषी
रोहोकडीच्या शेतकऱ्याकडून एकदिवसीय टोमॅटो पीक कार्यशाळेचे आयोजन
जुन्नर : आज पर्यंत आपण एखादी कंपनी किंवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केलेले पाहिले आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रोहोकडीचे प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांनी आपल्या शेतात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतल्यानंतर हे उत्पादन त्यांनी कसे घेतले ? हे इतरही शेतकऱ्यांना समजावे, त्यातून इतरही शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी दि. 12 फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात एकदिवसीय टोमॅटो पीक कार्यशाळेचे आयोजन केले होते.
आज पर्यंत आपण पाहत आलोय की, आपल्या शेजारचा, गावातील प्रगतशील शेतकरी इतरांना मार्गदर्शन करत नाही. परंतु अजित घोलप यांनी स्वतः एकदिवसीय टोमॅटो प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून वेगळा पायंडा पाडला आहे. या कार्यक्रमात त्यांनी टोमॅटो लागवडीसाठी बेसल डोस, मल्चिंग पेपरची निवड, दोन बीड मधील अंतर, रोपांची लागवड पद्धत, त्यानंतर टोमॅटोची बांधणी, उन्हाळी टोमॅटो उत्पादनासाठी टेंपरेचर मेंटेन करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर, वेगवेगळ्या प्रकारचे सापळे, जैविक, सेंद्रिय व रासायनिक असे एकात्मिक पद्धतीने टोमॅटोचे उत्पादन कसे घ्यायचे याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अजित घोलप यांनी वेगवेगळ्या विषयातील तज्ञांना कार्यक्रम स्थळी आमंत्रित केले होते. यात मल्चिंग पेपर निवड, वापर याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संजय नरोटे, टोमॅटो लागवडीसाठी रोपांची योग्य निवड, लागवडीनंतर रोपांची घ्यावयाची काळजी यासंबंधी माहिती देण्यासाठी विश्व हायटेक नर्सरीचे वीरेंद्र थोरात, टोमॅटो मध्ये पीजीआरचा योग्य वापर कसा करावा व उत्पादन कसे वाढवावे या बाबत गोपीनाथ दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. जैविक उत्पादने यामध्ये जैविक खते व औषधे याबाबत शेतकऱ्यांना डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी प्रशिक्षित केले. टोमॅटो मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व कीड रोग नियोजन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यासंदर्भात तुषार उगले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याबरोबर टोमॅटो मधील ट्रेस मॅनेजमेंट या संदर्भात डॉ. हेमांगी जांभेकर यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
या एकदिवसीय टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी महाराष्ट्रासह राजस्थान व कर्नाटक राज्यातून अभ्यासू प्रगतशील शेतकरी आले होते. या एकदिवसीय टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यशाळेच्या नियोजनासाठी ही मैत्री विचारांची या शेतकरी ग्रुपने मोलाचे सहकार्य केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी द फार्म च्या टीमने मदत केली. या यशस्वी प्रशिक्षणानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत अजित घोलप यांचे आभार व्यक्त केले व अशा कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांची नक्कीच प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही मैत्री विचारांची या ग्रुपचे बाजीराव गागरे यांनी केले.