साहित्य व संस्कृती

डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ एक दुर्मिळ संशोधनग्रंथ- संजय उकिरडे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय संतांनी भक्ती आणि समाजशक्तीला त्यांच्या उक्ती, कृतीतून बळ दिले. विविध सामाजिक घटकातील संतांचे साहित्य संशोधन झाले पाहिजे, यादृष्टीने डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ हा एक दुर्मिळ, परिश्रमपूर्वक निर्माण केलेला संशोधन ग्रंथ असल्याचे मत बेलापूर बदगी येथील रयत शिक्षण संस्थेतील चित्रकला शिक्षक आणि कुंभार समाजाचे कार्यकर्ते पत्रकार संजय उकिरडे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर वाचन संस्कृती प्रतिष्ठान वाचनालयात डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ या प्रकल्प संशोधन ग्रन्थाचे प्रकाशन संजय उकिरडे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संत गोरा कुंभार आणि सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय उकिरडे, कोतुळ येथील पत्रकार राजेंद्र उकिरडे, कु. प्राजक्ता उकिरडे, धांदरफळ येथील देवराम वाकचौरे यांना शाल, पुस्तकेे, बुके देऊन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, सचिव सौ.आरती उपाध्ये यांनी सत्कार व नियोजन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘भारतीय कुंभार समाजातील संत ‘या संशोधन ग्रन्थाची निर्मिती आणि अनुभव सांगितले.
महाराष्ट्रात तेर येथील संत गोरा कुंभार यांचे मध्ययुगीन काळात वारकरी संप्रदायात मोठे योगदान आहे. इ. स. 1267 ते 1317 या 50 वर्षाच्या जीवन वाटचालीत संत गोरा कुंभार हे एक विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले संत झाले. त्यांचे आज 23 अभंग उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे संत राका कुंभार (गुजरात ), संत कुबा कुंभार (राजस्थान ), श्रीयादेमाता (मध्यप्रदेश ), संत कवयित्री मोल्लाम्बा (आंध्रप्रदेश ), संत सर्वज्ञ (कर्नाटक ) असे प्रत्येक प्रांतात कुंभार समाजात संत आहेत. कुंभार समाजाचा इतिहास, पहिले ते तिसऱ्या शतकातील सातवाहन, शालिवाहन काळ यांचा प्रदीर्घ आढावा ह्या ग्रंथात घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या अनुदानातून हे संशोधन निर्माण झाले असून पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे हा 196 पृष्ठाचा ग्रंथ निर्माण झाला आहे, असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
संजय उकिरडे यांनी हा ग्रंथ म्हणजे कुंभार समाजातील एक दिशादर्शक संशोधन आहे, असे संशोधन विद्यापीठ पातळीवर फारसे झालेले नाही. नव्या अभ्यासकांनी असे दुर्मिळ, दुर्लक्षित विषयावर संशोधन केले तरच माय मराठीचे अभिजात मूल्य प्रतिष्ठित होईल असे सांगून डॉ. उपाध्ये यांना अमरावतीचा शब्दांगण साहित्य पुरस्कार, आमदार लहू कानडे यांच्या लोकहक्क फाऊंडेशनचा पुरस्कार लाभल्याबद्दल फेटा, शाल, बुके देऊन सत्कार केला. राजेंद्र उकिरडे, प्राजक्ता उकिरडे यांनी डॉ. उपाध्ये यांची अनेक पुस्तके मिळल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वाचन संस्कृती वाढविणारे कार्य आणि सुंदर वाचनालयाचे कौतुक केले. सौ.आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button