ठळक बातम्या

परफेक्ट मोदी अनपरफेक्ट निळवंडेचे उद्घाटन करणार का? – कृषीभुषण प्रभाताई घोगरे

लोणी : उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ५२ वर्षापासून अपुर्ण असलेल्या निळवंडे चे उद्घाटन प्रकल्प अपुर्ण असताना मार्च महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचा अट्टहास आहे. मात्र आपल्या प्रत्येक कामात परफेक्ट असणारे मोदी या अनपरफेक्ट निळवंडे चे उद्घाटन करणार का? हाचं मोठा प्रश्न असल्याचे कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी म्हटले आहे.
त्या पुढे म्हणाल्या जगात एक महानशक्तीशाली पंतप्रधान म्हणुन मोदींकडे पाहिले जाते. जगभर त्यांच्या नावाचा डंका वाजत असताना अर्धशतकापासुन प्रलंबीत व आजही अपुर्ण असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते मार्च महिन्यात करण्याच्या वल्गना सुरु आहेत. हे अत्यंत खेदजनक आहे. धरणाच्या दोनही मुख्य कालव्यांची कामे अद्याप अपुर्ण आहेत, या वर्षी निधीची तुटपुंजी तरतुद झाली आहे. वितरण व्यवस्थेचा मागमुस नसताना मोदींसारख्या परफेक्ट नेत्याच्या हस्ते या अनपरफेक्ट प्रकल्पाचे उद्घाटन कसे करताय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याने व केंद्राने प्रकल्पासाठी आवश्यक असणारा पावनेतीन हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा व वितरण व्यवस्थेची उर्वरीत कामे सहा महिन्यांत पूर्ण करावीत व त्यांनतर मोदींच्या हस्ते उद्घाटन करून घ्यावे असे पत्र त्यांनी मोदींना पाठविले आहे.
नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या संघटनांनी आजपर्यत निळवंडे धरण व पाणी हा प्रश्न जिवंत ठेवला आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली, शेतकर्‍यांवर आमानुष लाठीचार्ज झाला, अन्याय होऊनही शेतकर्‍यांनी हा प्रश्न अखंडित तेवत ठेवला म्हणुन बावन्न वर्षात निळवंडे प्रकल्प इथपर्यंत आला. ज्या निळवंडेसाठी अजुनही जवळपास २ हजार ८०० कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात फक्त २६९ कोटी रुपयांची तुटपुंजी तरतूद सरकारने केली आहे. अशीच तरतुद सरकार करत राहिल्यास अजुनही किमान चार सुप्रमा घेवुन प्रकल्पाचा खर्च आणखी वाढुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आणखी काही पिढ्या खपणार आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला अजुनही दहा वर्ष पाणी मिळेलच याची खात्री नाही.
राज्यकर्त्यांनी बावन्न वर्षापासून मोठ्या चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. राज्यात व देशात भाजपा प्रणीत सरकार आहे, असे असताना अर्थसंकल्पात राज्याने अंत्यत तुटपुंजी तरतूद केली आहे. त्यातच दोन्ही कालव्यांचे कामे अपूर्ण असताना व वितरण व्यवस्थेसाठी निधीची अजिबात तरतुद नसताना अपूर्ण कालव्यांची चाचणी घेऊन पाणी सोडल्यास यातून शून्य टक्के सिंचन होणार आहे. केवळ राजकीय अट्टहासापाई प्रकल्प पुर्ण नसताना त्याचे उद्घाटन करणे न्याय संगत होणार नाही. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहात. मात्र कालव्यांचे कामे तर सोडाच लाभक्षेत्रातील वितरण व्यवस्था शुन्य टक्के पूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा अजिबात फायदा होणार नाही.
देशाचे पंतप्रधान यांची देशासह जगात शक्तिशाली व परफेक्ट पंतप्रधान म्हणून ख्याती आहे. जी व्यक्ती जगात परफेक्ट कामासाठी नामांकित आहे अशा नामांकित व्यक्तीच्या हातून पूर्ण नसलेल्या व शून्य टक्के सिंचन व्यवस्था असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे योग्य होणार नाही. केंद्र व राज्याने उर्वरित कामांसाठी किमान अडीच हजार कोटींची तातडीने तरतुद करून येत्या सहा महिन्यात प्रकल्प पूर्ण करावा व मोठ्या मनाने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करावे. दुष्काळी शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष शेतीच्या पाण्याची विवंचना व दुष्काळ संपवावा, असे झाल्यास जिरायत शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही पंतप्रधानांचे निळवंडेच्या पाण्याने पाद्यपूजन करू असे कृषीभूषण प्रभावती घोगरे यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भातील निवेदनाचे पत्र देशाचे पंतप्रधान मोदींना पाठविले आहे.
तर निळवंडेच्या पाण्याने मोदींची पाद्यपुजा करु- सौ.कृषीभुषण प्रभाताई घोगरे
     आवश्यक निधी उपलब्ध होवुन गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून रखडलेल्या निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचुन उद्घाटन झाल्यास जिरायत भागातील माताभगिनी यांच्या वतीने पंतप्रधान मोदींची त्याच निळवंडेच्या पाण्याने पाद्यपूजा करु.
मोदींना बदनाम करू नका – शेळके
  निळवंडेच्या नावाखाली लाक्षेत्रातील नेत्यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून शेतकऱ्यांना बनवलं आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी हे नेते अपूर्ण असलेल्या कामाचे उद्घाटन देशाचे शक्तिशाली पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचा घाट घालत आहेत. मात्र तो प्रकल्प मुळातच पूर्ण नाही ज्यातून शून्य टक्के सिंचन व्यवस्था होणार आहे, अशा प्रकल्पाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करणे म्हणजे आपले पन्नास वर्षांचे पाप लपविण्याचे कारस्थान करण्याचे षडयंत्र आहे. मोदींसारख्या शक्तीशाली नेत्याला यात बदनाम करू नका, असे निळवंडे पाटपाणी कृती समिती नगर नाशिकचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी म्हटले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button