धार्मिक

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व नऊ शनिवार नोव्हेनाला प्रारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबाद प्रमाणे भव्य मतमाउली यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात्रापूर्ण नऊ शनिवारी सायंकाळी नोव्हेना भक्ती होत असते. मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा पहिला शनिवार भक्तिभावाने संपन्न झाला. त्यापूर्वी पवित्र मारिया मूर्तीची भव्य मिरवणूक चर्च प्रांगणात काढण्यात आली.

यावेळी झालेल्या पहिल्या नोव्हेना प्रसंगी पवित्र मरिया सह्भागीता या विषयावर रे.फा.पॉली डिसिल्व्हा यांनी पवित्र मरीयेची विश्वासाव्दारे सह्भागीता, पवित्र मरीयेची समर्पणव्दारे सह्भागीता, आत्मिक प्रवासाव्दारे सहभागीता, सुसंवादाव्दारे सहभागीता, व श्रद्धा एक तिसरा डोळा आहे, आदी पवित्र मारियाच्या जीवनावर सविस्तर विवेचन केले.

तसेच रे.फा सतीश कदम यांनीही यावेळी सांगितले की, परमेश्वराच्या मानवी तारण योजनेप्रमाणे पवित्र मरिया मातेची सहभागीता ही दैवी आहे. प्रथम तिने देवाची माता बनून सहभागीता दिली. दुसरी सहभागीता ती मानव जातीची माता बनून दिली. तिसरी सहभागीता विश्वव्यापी ख्रिस्तसभेची माता बनून दिली. आजही ती आपल्या सर्वांच्या तारणासाठी सतत मध्यस्थी करीत आहे. जशी आई आपली आई काळजी घेते, तशीच ही पवित्र मरिया आपल्या सर्वांची मने जाणते म्हणून तिला मतमाउली म्हणतो आणि ती प्रभू येशू आपल्या बाळाकडे आपल्यासाठी विनंती करीत असते.

प्रथम नोव्हेना प्रसंगी संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहाता येथील प्रमुख धर्मगुरू पॉली डिसिल्व्हा, सहाय्यक धर्मगुरू फा.जॉन गुलदेवकर, फा. आनंद बोधक, हॉली फामिली चर्च कोपरगाव प्रमुख धर्मगुरू फा. विशाल त्रिभुवन, सहा.धर्मगुरू सचिन मुन्तोडे, रोझरी माता चर्च कोळपेवाडी प्रमुख धर्मगुरू सतीश कदम, व हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा. डॉमनिक रोझारिओ, फा.फ्रान्सिस ओहोळ, फा.संतान रॉड्रीग्ज तसेच सर्व धर्मभगिनी सहभागी झाल्या होत्या. शुभारंभ असल्याने भाविकांची अलोट उपस्थिती होती.

येत्या शनिवारी १३ जुलै रोजी पवित्र मरिया ख्रिस्ती ऐक्य या विषयावर निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बाळ येशू चर्च बाभळेश्वर येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत अशी माहिती प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक यांनी दिली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button