ठळक बातम्या

अखेर आकारी पडीत संघर्ष समितीचे उपोषण सुरू

शेवटच्या श्वासापर्यंत आकारी पडीत लढा लढणार- जिल्हाध्यक्ष औताडे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न शासनाने न सोडविल्याने आकारी पडीत संघर्ष समितीने 12 मार्च पासून श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. याबाबत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे न्यायालयीन लढा लढत आहे. सदर आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. काळे यांनी मोफत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने शासनाकडे शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी बाबत कुठलाही मोबदला दिलेला नसून तसे अवॉर्डही ताब्यात घेण्यासाठी झालेले नाही, ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. साहजिकच महाराष्ट्र सरकार महसूल विभाग न्यायालयात माहिती देण्यासही असमर्थ ठरत असून शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याचा निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवत असल्याच्या निषेधार्थ उंदीरगाव, खानापूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, ब्राम्हणगाव, वडाळामहादेवच्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

आज सकाळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणासाठी मंडप टाकला असता प्रशासनाने सदर मंडप घालविण्यास भाग पाडले त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कचरा डेपोच्या शेजारी मंडप टाकून उपोषण सुरू केले. परंतु तेथे दीड दोन तास बसल्यानंतर नगरपालिकेच्या कचरा डेपो शेजारी मेलेली कुत्री टाकली असल्याने वयोवृद्ध माता भगिनीसह वयस्कर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना त्रास होऊ लागल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, डॉक्टर दादासाहेब आदीक, सुदामराव औताडे, आकारी पडीत संघर्ष समितीचे शरद आसने, सोपान नाईक, ॲड. सर्जेराव घोडे, अण्णा पाटील थोरात यांनी सदर आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात उन्हात करण्याचे ठरविले त्यामुळे सर्व आंदोलन करते मंडप सोडून घोषणा देत तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारच्या तीव्र उन्हामध्ये दोन तास बसले. त्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी उपोषणकर्त्या आंदोलन शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये बसण्याची तोंडी परवानगी दिली. त्यामुळे सर्व आंदोलक यांनी दुपारी दोनच्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये उपोषण सुरू केले. दोनशे ते अडीचशे आकारी पडीत शेतकरी उपोषणासाठी सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत उपोषण स्थळी बसून होते. यावेळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत शासन हक्काच्या जमिनी सोडत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे.

या आंदोलनात बबनराव नाईक, शिवाजी आढाव, गोविंद वाघ, अशोक दुधेडिया, सी वाय पवार, राजेंद्र कासार, शालनताई झुरळे, बाळासाहेब आसने, सुनील आसने, रावसाहेब आढाव, बाळासाहेब कासार, अनिल आसने, बापूसाहेब गलांडे, अशोक गुळवे, बाबासाहेब अनुसे, बबनराव वेताळ, सतीश नाईक, रावसाहेब नाईक, हरिभाऊ बांद्रे, नानासाहेब गुळवे व आकारी पडीत उपोषणकर्ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. 1918 या वर्षी ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनी वीस वर्षाच्या परतीच्या बोलीवर घेतल्या होत्या. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्र शासनाने सदर जमिनी शेतकऱ्यांना परत केल्या नाहीत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button