अहमदनगर

विडी कामगार व कृषीतील कार्याबद्दल सौ.सखुबाई वाकचौरे यांचा नारी-शक्ती पुरस्काराने गौरव

राहुरी | जावेद शेख : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने नारी शक्ती सन्मान सोहळा सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज व आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे हे होते. शिवव्याख्याते प्रदीप कदम, विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, आनंद दिघे इंग्लिश स्कुल चे सचिव अनिल राहणे उपस्थित होते.

सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे ह्या कळस बू येथील असून विडी कामगार चळवळ व आंदोलनाच्या माध्यमातून गरिब, निराधार, विधवा महिलांच्या सबलीकरणाचे विशेष कार्य केले आहे. विडी कामगार यांचे हक्कासाठी रस्ता रोको, मोर्चा असे अनेक सविनय व कायदेशीर मार्गाने लढा दिला. वेतन वाढ, पगारी रजा, पेन्शन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलने केली. यात अनेक वेळा सात सात दिवस तुरुंगवास येरवडा, विसापूर येथे भोगावा लागला.

कळस गावात एक विडी कारखाना असल्याने महिलांना काम मिळत नसे म्हणून पाच किलोमीटर पायी जाऊन विड्या बांधण्याचे काम केले. या महिलांसाठी दुसरा कारखाना गावात आणला. स्वतः या कारखान्याच्या इमारतीच्या भिंती सारून लोक वर्गणी काढून इमारत बांधली. या महिलांची वणवण थांबवली. अनेक मुली, महिलांना विडी बांधण्याचे शिकविले, अनेक महिलांचे प्रपंच उभे राहिले. या महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. आदिवासी ठाकर समाजाचा वाटेकरी याला घरकुल साठी स्वतःची जागा बक्षीसपत्र करून दिली.

सौ. सखुबाई वाकचौरे यांनी विडी बांधण्याचे काम बंद केल्यानंतर आपले कोरडवाहू शेतीचे बागायती शेतीत रूपांतर करून गोपालन व दुग्ध व्यवसाय सुरु केला. जिल्हा परिषद नगर च्या वतीने कृषी अन पशुपालन यातील योगदानाबद्दल प्रगतशील शेतकरी पुरस्कार, महाराष्ट्र शासन व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने महिला सबलीकरणच्या कार्याबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button