अहमदनगर

राहुरीतील मोतीबिंदू शिबिराचा १३५ रुग्णांनी घेतला लाभ

राहुरी : राम रामेश्वर फाउंडेशन, दिव्यांग शक्ती सेवा संस्था व राम डेंटल क्लिनिक राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू निदान, दंत व कान तपासणी शिबिराचा तालुक्यातील १३५ रुग्णांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे हे होते. शिबिराचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय तमनर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत राम रामेश्वर फाउंडेशनचे डायरेक्टर अक्षय गिरगुणे यांनी केले.

या शिबिरात आनंद ऋषीजी नेत्रालयाचे डॉ. सचिन शेलार यांनी ४५ नेत्र तपासणी करून १२ रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविले. आतापर्यंत ८२ शिबिर यशस्वी झाले असून, ४७९० रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. दंत रोगाच्या ३० रुग्णांची तपासणी डॉ. महेश इघे यांनी केली. कर्ण रोगाच्या ६० रूग्णांची तपासणी डॉ. प्रभाकर वावरे यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इगे यांनी तर प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी केले.

याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यातील सामाजिक संघटना या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी काम करत आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संत गाडगे बाबा आश्रम शाळेत शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी योगेश लबडे, सलीमभाई शेख, रवींद्र भुजाडी, प्रभाकर बरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button