कृषी

भारत-जर्मनी आणि बेनीन देशातील त्रिदेशीय सहकार्य करार संपन्न

राहुरी विद्यापीठ : बेनीन देशामध्ये कृषि अवजारे, यंत्रे चाचणी व प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीसाठी नुकताच महात्मा फुले कृषि विद्यापीठातील तज्ञांचा बेनीनला दौरा झाला. या दौर्याचे आयोजन जर्मन सरकारच्या जि.आय.झेड. या संस्थेमार्फत करण्यात आले होते. कोणतेही कृषी यंत्र विकसीत केल्यानंतर त्या यंत्राची चाचणी व प्रमाणीकरण ही प्रक्रिया करावी लागते.

कृषि अवजारे व यंत्रे यांची चाचणी व प्रमाणीकरण करण्यासाठी भारतामध्ये वापरात असलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती कोटनौ बेनीन येथे पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अधिष्ठाता (कृषि अभियांत्रिकी) डॉ. दिलीप पवार, कृषि यंत्रे व शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे व कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुलशीदास बास्टेवाड यांनी दिली. तसेच बेनीनमध्ये कृषी यांत्रीकीकरणाला चालना देण्यासाठी यंत्र प्रमाणीकरण यंत्रणा उभारणी करण्याबाबत सखोल चर्चा केली.

या कार्यशाळेला बेनीन देशातील कृषी संशोधक, अवजारे उत्पादक, प्रमाणक अधिकारी, कृषी मंत्रालय अधिकारी आणि जर्मन कौन्सिलचे प्रतिनिधी उपस्थित होते. या काळात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने बेनीनच्या राष्ट्रीय कृषी विद्यापीठाला शिक्षण आणि संशोधनात मदत करण्याबाबत सामंजस्य करार ही केला. या करारावेळी डॉ. दिलीप पवार व बेनीन येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर आगोसाऊ देजोसा यांनी या करारावर स्वाक्षर्या केल्या.

सदरचा सामंजस्य करार पोर्टनौ, बेनीन येथे पार पडला. यावेळी विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच जि.आय.झेड. भारताचे प्रतिनिधी समीर वलदिया आणि जि.आय.झेड. बेनीनचे प्रतिनिधी जुलस ओडोनु हे उपस्थित होते. बेनीन देशातील कृषीचे संशोधक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे तसेच प्रयोगशाळा स्थापन करण्यात तांत्रिक सहकार्य करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button