योजनेच्या मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी मिळण्याची कोंढवड ग्रामस्थांची मागणी
राहुरी : ‘राजा तुपाशी व रयत उपाशी’ असा काहीसा प्रकार तालुक्यातील कोंढवड गावात घडत असताना ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कारभाराला वैतागून अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व राहुरीचे तहसीलदारांना निवेदन देऊन बारागाव नांदूरसह चौदा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी मिळण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोंढवड ग्रामपंचायतीने पाच दिवसांपासून संपूर्ण गावातील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. टँकर सुरू करुनही दोन दिवसानंतरही थकबाकी नसलेल्या ग्रामस्थांच्या घरी पाणी पुरविण्यासाठी टँकर आला नाही. परंतु पाण्याने भरलेले टँकर मात्र ग्रामपंचायत आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या घरी खाली करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी योजनेच्या संस्था कर्मचारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मुख्य जलवाहिनीला नळ जोडणीची मागणी केल्याने त्यांच्याकडून राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यासाठी परवानगी देतात, अशी माहिती मिळाली.
त्यामुळे या ग्रामस्थांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बारागाव नांदूरसह चौदा गावे पाणीपुरवठा योजनेवर काही व्यक्तींना मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी दिली आहे, त्या पद्धतीने कोंढवड येथील ग्रामस्थांनाही नळ जोडणी मिळावी, जर अशी परवानगी नाकारल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ दि. १०/ ११/ २०२३ रोजी तहसील कार्यलयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा राहुरीचे तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे. यासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तताही ग्रामस्थ करणार आहे.
तसेच ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसभा व मासिक बैठकीत ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.परंतु ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा बंद करून जनतेस वेठीस धरून नागरिकांचा कोणत्या हिताचा निर्णय घेतला आहे हे ग्रामस्थांना उमजायला तयार नसल्याने गावात घडत असलेल्या या सर्व घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हसे, मधुकर म्हसे, संभाजी म्हसे, अनिल म्हसे, संजय पिसाळ, अनिल पिसाळ, महेश म्हसे, भागवत मोरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांना ग्रामसेवक कोंढवड यांना सूचना करण्यास सांगितले होते. विस्तार अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना काय सूचना केल्या आहेत या गुलदस्त्यात असून कोंढवड ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सरपंचांनी राजीनामा द्यावा – सुरेश म्हसे
पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच व निवेदन देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी मी फक्त दोन दिवस पाणी पुरवठा बंद करण्यास सांगितले होते, असे सरपंच म्हणाले. परंतु आज पाच दिवसानंतरही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने सरपंच यांचे ग्रामपंचायत मध्ये कोणी ऐकत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सुरेश म्हसे यांनी केली आहे.