महाराष्ट्र

राजीनाम्याची नौटंकी थांबवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा – देवेंद्र लांबे

राहुरी – सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची नौटंकी थांबवून मराठा समाजाला न्याय द्या, असे प्रतिपादन देवेंद्र लांबे यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान केले आहे.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सोमवार दि.३० ऑक्टोबर २०२३ पासून राहुरी तहसील कार्यालय येथे साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणास मराठा समाजाबरोबर सर्वच जाती धर्मातील बांधवांनी सहभागी होत पाठींबा दर्शविला आहे. आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस होता. या साखळी उपोषणात सोनगाव, सात्रळ, धानोरे, रामपूर, कानडगाव, तांदूळनेर आदी गावातील ग्रामस्थांनी सहभागी होत तहसील कार्यालय परिसर घोषणा देत दणाणून सोडला.

या प्रसंगी बोलताना मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदार व सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी हे राजीनामा देवून मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. लोकप्रतिनिधी यांना जनता मतदान करून निवडून देऊन विधानसभा व लोकसभेत नागरिकांच्या व्यथा मांडण्यासाठी पाठवतात. परंतु लोकप्रतिनिधी त्यांचे काम न करता मराठा समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी राजीनामा देवून आपल्या कर्तव्यापासून मैदान सोडून पळ काढत आहेत.

राजकीय पुढारी व पदाधिकार्यांना मराठा समाजाला न्याय मिळावा असे जर वाटत असेल तर त्यांनी राजीनामा न देता तसेच मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी न होता तात्काळ विधीमंडळात आवाज उठवत एकमुखी मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी दबाव तयार करणे गरजेचे आहे. तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे न देता आपल्या पक्ष प्रमुखांना मराठा आरक्षण विषयात ठोस भूमिका घेण्यासाठी दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे नाटक तात्काळ थांबून आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन लांबे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button