‘ठिणगी’ मधून पुंडलिक गवंडी यांचा प्रखर सामाजिक जाणिवांचा आविष्कार – डॉ. रामकृष्ण जगताप
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अकोले येथील ‘हातोडा’कार पुंडलिक गवंडी /कुमावत यांच्या ‘ठिणगी’ या आत्मचरित्रातून प्रखर सामाजिक जाणिवांचा आविष्कार व्यक्त झाला असल्याचे मत प्रख्यात संमोहनतज्ञ ‘पोरका बाबू’कार डॉ. रामकृष्ण जगताप यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अकोले येथील साहित्यिक पुंडलिक गवंडी यांच्या ‘ठिणगी’ या आत्मचरित्रावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ. रामकृष्ण जगताप बोलत होते. यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. आरती गणेशानंद उपाध्ये, ताराताई सैंदोरे, निर्मिक उपाध्ये आदी उपस्थित होते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविकेत सांगितले की, प्रकाशनपूर्व परिसंवाद, चर्चा ही पुस्तकाला अधिक उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने ‘ठिणगी’ या आत्मचरित्राचे वाड्मयीन मूल्यमापन या चर्चेतून मांडले आहे. डॉ. रामकृष्ण जगताप यांचा यावेळी पोरका बाबू तिसरी आवृत्ती संयोजन आणि संमोहन क्लिनिक उभारणीबद्दल सन्मान करण्यात आला.
डॉ. रामकृष्ण जगताप म्हणाले, पुंडलिक गवंडी यांनी 1992 मध्ये ‘हातोडा’ हॆ आत्मकथन लिहिले, त्यामध्ये बालपण, शिक्षण आणि जीवनातील काही अनुभव आहेत तर ‘ठिणगी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक अनुभवांची प्रांजळ आणि वास्तवदर्शी मांडणी केली आहे. त्यामुळे हॆ अलीकडच्या काळातील प्रखर आणि माणुसकीच्या आठवणींचे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.
हडपसर येथील आकुबाई कॉलेजच्या प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे यांनी ‘ठिणगी’ मधील 2003 च्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ अधिक प्रभावी झाला आहे. ‘हातोडा’ ऑगस्ट 1992 ला प्रकाशित झाल्यावर अनेक साहित्यिक, मित्रपरिवाराने या पुस्तकाचे कौतुक केले, त्याचे चिंतनही येथे आले आहे. यादृष्टीने हॆ लेखन अधिक संपन्न आणि मोजक्या प्रसंगातून कलात्मकपणे मांडले आहे. आरती उपाध्ये यांनीही काही प्रसंग वाचले. पुंडलिक गवंडी यांच्या अनेक प्रकारातील लेखनाचा आढावा घेतला. प्रतिष्ठानच्या खजिनदार सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.