कृषी

जाणून घेऊयात कोण आहेत ऑक्टोबर महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन सौरभ कोकीळ व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन सुबोध भिंगार्डे यांची निवड झालेली आहे. सौरभ काकीळ हे सातारा जिल्ह्यातील शेतकरी असून कृषि पदवीधर सुबोध भिंगार्डे हे मु.पो. मलकापूर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर येथील कृषि उद्योजक आहेत.

शेतकरी आयडॉल सौरभ कोकीळ हे मु.पो. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील शेतकरी असुन त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे विकसित शाश्वत 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 130 टनापर्यंत उत्पादन घेतले. परिसरातील इतर शेतकर्यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी बळीराजा शेतकरी बचत गटाची स्थापना केली. तसेच ऊस उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर केला. श्री. कोकीळ यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये वसंतराव नाईक ऊसभूषण पुरस्कार तसेच बेस्ट फार्मर पुरस्कार, त्याचप्रमाणे भा.कृ.अ.प. एन.डी.आर.आय., कर्नालचा इनोव्हेटिव्ह फार्मर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

तसेच कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथून कृषिचे शिक्षण घेतलेले कृषि पदवीधर आयडॉल कृषि उद्योजक सुबोध भिंगार्डे यांनी कोल्हापूर येथे शैलेश नर्सरीची 35 एकर क्षेत्रावर उभारणी केली. ज्यामध्ये 1500 प्रकारच्या प्रजातींचे वाण, दोन एकरांचे शेडनेट व दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. त्यांच्या नर्सरीमध्ये शोभीवंत वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती, भरपूर पर्याय, उत्तम विकसित रोपे व मोठ्या आकाराच्या रोपांची उपलब्धता असल्यामुळे या रोपांना महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून भरपूर मागणी आहे. त्यांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर 25 गुंठे क्षेत्रात गार्डन सेंटरची उभारणी केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना शेतीसाठी लागणारे सर्व खते, औषधे, बियाणे, टूल्स, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत. वर्षभर त्यांच्या उद्योगाच्यामार्फत 100 पेक्षा जास्त व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. श्री. भिंगार्डे यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी विविध देशांचे अभ्यास दौरे केले आहेत. तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button