लोकशाहीर,साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले तर तो बहुजनांचा खरा सन्मान होईल – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्य हा समाज जीवनाचा आरसा आहे, त्यात आहे त्या काळाचे, समाजाचे, वेदनेचे, आनंदाचे दर्शन घडले पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी, वंचित, दुर्लक्षित समाजाचे दर्शन आपल्या लेखनातून घडविले, त्यामुळेच ते बहुजनांचे प्रेरणास्थान असून त्यांना भारतरत्न सन्मान मिळाला तर तो बहुजनांचा गौरव होईल असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील कलाकार, कलावंत, साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवशीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. कविसंमेलन, परिसंवाद आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा असे विविध भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले.
प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संयोजक कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचे सत्कार केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, छत्रपती संभाजीनगरचे उदघाटक प्रा.डॉ.अंबादास सगट, प्रमुख पाहुणे प्रा.टी.एस. चव्हाण,अधिस्वीकृती समितीचे सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे, उत्पादन शुल्क निरीक्षक गोपाळ चांदेकर, परिसंवाद अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे, कविसंमेलन अध्यक्ष प्रा.कवी पोपटराव पटारे, मुंबईचे सेवाभावी साहित्यिक सागरकुमार रंधवे, इंजिनिअर, आर्किटेक्त्त कॆ. कॆ. आव्हाड, मुंबईचे अशोकराव आल्हाट, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे आदी उपस्थित होते.
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे : व्यक्तित्व आणि साहित्य या विषयावर परिसंवाद प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक लेविन भोसले, सागरकुमार रंधवे यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.शिवाजी काळे यांनी अध्यक्षीय भाषणातून या विषयाचा विस्तृत आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाले. प्रा.कवी पोपटराव पटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कविसंमेलनात अनेक कवी, कवयित्री यांनी कविता सादर केल्या. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. उदघाटक प्रा. डॉ.आनंदास सगट म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे तुकाराम भाऊराव साठे यांनी फकिरा हा वंचित समाजाचा नायक उभा करून मुक्या समाजाला बोलते केले.
पुरोगामी विचारधारा, स्वातंत्र्ययुद्ध सहभाग, कष्टकरी, श्रमजीवी लोकांचे साहित्य त्यांनी लिहिले. राष्ट्रप्रेम आणि समाजप्रिती ही त्यांची ओळख आहे. मायमातीला त्यांनी जपले. ते उत्थानाचे वादळ होते तरी जीवनमूल्यांची त्यांनी पाठराखण केली, असे सांगून वडाळा महादेव ग्रामस्थांचे कौतुक केले. प्रा. टी. एस. चव्हाण, गोपाळ चांदेकर, सुभाष त्रिभुवन, कॆ.कॆ.आव्हाड, अशोकराव आल्हाट यांची भाषणे झाली. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी समारोप करताना आपल्या भाषणात पुढे सांगितले की, कवी बाबासाहेब पवार हॆ सेवाभावी साहित्यिक आहेत, अनेक वर्षांपासून ते अशी साहित्य संमेलने घेऊन कष्टकरी, वंचित, दुर्लक्षित कलाकार, कलावंत, साहित्यिक यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरव करतात.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात, हॆ निरपेक्ष कार्य लाखमोलाचे आहे. पैसा नसला तरी लोकांचा सहभाग आणि मनात सेवाभाव जपत ते साहित्यसंमेलन घेतात ही खरी मानवता आहे, हॆ खरे समाज प्रबोधनकारी संमेलन होय असे सांगून दिवसभर चाललेल्या उपक्रमाचा गौरव केला. दीपक तरकासे, राजेंद्र थोरात, रज्जाक शेख, हरिदास काळे, रमेश जेठे, निवृत्ती श्रीमंदिलकर, वैरागर आदिंनी कविता सादर केल्या.
सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकात वाकचौरे यांनी केले. समाजातील अण्णा भाऊ साठे यांच्या सेवाकार्याला समर्पित व्यक्तींना गौरविण्यात आले. भाऊसाहेब भोंडगे, मेजर मारुती भोंडगे, सौ. छाया पवार, कु. सुहाणी पवार, कु. प्रिया पवार, आशिष पवार आदिंनी नियोजनात भाग घेतला. बाबासाहेब पवार यांनी आभार मानले.