शिवसेना व भाजपा पक्षाच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेत ठ्ठिया देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
राहुरी – राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनात शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने ठ्ठिया देत राहुरी शहरातील अडचणींविषयी पाढा वाचत नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, भाजपाचे प्रफुल्ल शेळके, गणेश खैरे, सचिन मेहेत्रे, तनपुरे, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, शिवनाथ सत्रे, ज्ञानेश्वर सप्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे यांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरत शहरातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून नागरिक स्वखर्चातून गटारी वरील तुटलेले ढापे टाकत आहेत.
गणेश मंडळांसमोरील उखडलेले रस्ते बुजविण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कॉलेज रोड, ब्लड बँक रस्ता ते डॉ.कोरडे दवाखाना रस्ता, डॉ.खुरुद दवाखाना समोरील भराव या ठिकाणी प्रचंड दैनिय अवस्था झालेली असतांना वेळोवेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी तात्काळ कामे मार्गी लावण्याचे सांगून देखील काम होत नसल्याने मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास श्री.लांबे यांनी समस्या आणून दिल्या.
प्रफुल्ल शेळके यांनी राहुरी शहरात नव्याने झालेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्ज्याची झालेली आहे. त्याची चौकशी करून सदर कामाच्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. काळे आखाडा, येवले आखाडा, महात्मा चौक परिसरातील अडचणी विषयी शेळके यांनी तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी शिवसेना – भाजपाच्या वतीने नगरपालिका प्रशासनास पत्र देण्यात आले. त्या पत्रात म्हंटले आहे कि, नुकतेच राहुरी शहरात राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत राहुरी शहरात भुयारी गटार योजने करिता रक्कम १३४ कोटी ९८ लक्ष निधी देण्यात आला. त्यापैकी रक्कम ९२ कोटी ९८ लक्ष निधीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
शहरातील भुयारी गटार योजनेचे काम उत्कृष्ट व्हावे व या कामाचे स्वरूप राहुरी शहरातील नागरिकांना अवगत व्हावे या दृष्टीने राहुरी शहरात किमान १० ठिकाणी प्रथमदर्शनी भागात भुयारी गटार योजनेचे अंदाजपत्रक (Estimete) व कामाचे मोजमाप पत्रक फ्लेक्स बोर्ड लावून प्रसारित करण्याची मागणी करण्यात आली.
अंदाजपत्रक (Estimete) व कामाचे मोजमाप पत्रक फ्लेक्स बोर्ड लावून प्रसारित केल्याने कामात पारदर्शकता येवून नागरिकांना देखील शासनाद्वारे जनतेच्या सोयीसाठी राबवत असलेल्या योजनेची माहिती मिळून जनता स्वतः होत असलेल्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून उत्कृष्ठ काम होईल. पत्राची दखल न घेतल्यास सदरील कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दोषी धरून कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या शिष्टमंडळात सुजय काळे, शरद येवले, उमेश शेळके, मधुकर पोपळघट, रोहित नालकर, अरुण जाधव, मिलिंद हरिश्चंद्रे, अविनाश शिरसागर आदींचा समावेश होता. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, खा.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, शिर्डी, मा.तहसिलदार यांना देण्यात आल्या.