कृषी

कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने एकत्र येऊन रब्बी हंगामासाठी काम केल्यास रब्बी हंगाम यशस्वी होईल – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार

महात्मा फुले कृषी विद्यापीठात अप्पर मुख्य सचिवांनी घेतला रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा

राहुरी विद्यापीठ : यावर्षी जून महिन्यापासून आज अखेरीस पाऊसमान कमी असल्याने राज्यात रब्बीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आगामी दिवसात पावसाची शाश्वती तेवढी राहिलेली नाही. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी असून भविष्याकरिता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे लागेल. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन करताना विविध रब्बी पीक पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

राज्यात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी विभागाच्या समन्वयाने रब्बी हंगाम नियोजन चर्चासत्र २०२३-२४ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अनुप कुमार बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यापीठाचे नियंत्रक सदाशिव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले व आपल्या सादरीकरणांमध्ये त्यांनी सांगितले की विद्यापीठाने स्थापनेपासून आजपर्यंत 286 विविध पिकांचे वाण, 1774 शिफारशी व 44 कृषी यंत्रे शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेली आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये प्रभावी पद्धतीने काम करीत आहे, असे याप्रसंगी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. चिदानंद पाटील यांनी केले.

यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात सुरुवातीला सुधाकर बोराळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चालू खरीप हंगामामधील पीक परिस्थिती व रब्बी हंगाम २०२३-२४ साठीचे पूर्वनियोजन यावर सादरीकरण केले. विद्यापीठाच्या बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी रब्बी हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता यावर सविस्तर माहिती दिली. ज्वारी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दीपक दुधाडे यांनी रब्बी ज्वारी खालील क्षेत्र वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, कोल्हापूर येथील मका संशोधन प्रकल्पाचे मका पैदासकार डॉ. सुनील कराड यांनी मका पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे व मुरघास तयार करण्यासाठी योग्य वाण यावर तर कोल्हापूर येथील नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख तथा नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन यांनी नाचणी व तत्सम पौष्टिक तृणधान्य पिकांचे पर्यायी रब्बी पीक पद्धतीसाठी वाव यावर सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी तर आभार सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, कार्यक्षेत्रातील विविध पीक विशेषज्ञ, प्रकल्पांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button