साहित्य व संस्कृती

श्रवण संस्कृतीकडून वाचनाकडे नेण्यासाठीची वाचकपीठ समूहाची काव्यचर्चा राज्यात प्रथमच – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील

नगर – श्रवण संस्कृतीकडून वाचन संस्कृतीकडे नेण्यासाठी वाचकपीठ समूहाने सुरू केलेली काव्यचर्चा महाराष्ट्रातील पहिलीच साहित्यिक चळवळ असेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले.

वाचकपीठ समूह आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर, मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचक मेळावा, काव्यचर्चा व काव्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ. बाळासाहेब सागडे हे होते. डॉ. संजय कळमकर, चंद्रकांत पालवे, जयंती येलुलकर, सुनील गोसावी, प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर, प्रा. डॉ.सुधाकर शेलार, प्रा. डॉ. संदीप सांगळे, डॉ बापू चंदनशिवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला. पुढे बोलताना ठाले पाटील म्हणाले की, ‘उच्च दर्जाची साहित्यिक समज असलेली लोक या साहित्यिक चळवळीशी जोडली जातील, वाचन करुन गांभीर्याने कवितेची अभिरुची समजून घेणारी ही महत्वपूर्ण चळवळ असेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी करून आत्तापर्यंत झालेल्या 36 चर्चा बद्दलची माहिती दिली. वाचकपीठचा उद्देश आणि स्थापने पाठीमागचा इतिहास सांगितला. प्रा. डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांनी स्वागत केले तर माधुरी चौधरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती धर्माधिकारी व साधना कस्पटे यांनी केले.

दुसऱ्या सत्रात अनुराधा पाटील यांच्या आता वह्या सगळ्या बुडीत खाती या काव्यसंग्रहावर मासिक काव्यचर्चा झाली. यामध्ये प्रमुख भाष्यकार म्हणून प्रा. कविता मुरूमकर, सोलापूर, प्रा.डॉ. समिता जाधव, औरंगाबाद यांनी सहभाग घेतला. शरद ठाकूर व भास्कर निर्मळ यांनीही पुस्तकावर चर्चा केली. यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी परिचय करून दिला तर अरविंद सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. वैशाली भालसिंग यांनी आभार मानले.

तिसऱ्या सत्रामध्ये औरंगाबाद येथील ज्येष्ठ कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी व संदीप काळे यांनी केले. या काव्य संमेलनामध्ये डॉ. विशाल इंगोले, प्रा.शशिकांत शिंदे, मारुती सावंत, हबीब भंडारे, ज्योती धर्माधिकारी, लवकुमार मुळे, प्रा. डॉ. शंकर चव्हाण, गिरीश सोनार, शालिनी वाघ यांनी कवितांचे वाचन केले.

आज पर्यंत झालेल्या ३६ मासिक काव्य चर्चेतील कवींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.अनुराधा पाटील व प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचकपीठचे सदस्य व न्यू आर्ट्स चे प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button