गुन्हे वार्ता

रक्षकच झाला भक्षक, राहुरीचे पोलिस उपनिरीक्षकच निघाले बलात्कारी, गुन्हा दाखल

राहुरी | बाळकृष्ण भोसले : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना आज राहुरी तालुकाही मागे राहिला नाही. त्यातल्या त्यात चक्क वर्दितलाच माणूस बलात्कारी निघाल्याच्या घटनेने तालुकाच हादरला आहे.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद असलेला रक्षकच जर भक्षक झाला असेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न आता जनतेला पडणं साहजिक आहे. राहुरी पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक पदावर असलेले सज्जनसिंग नार्हेडा यांच्यावर तालुक्यातील दवणगाव येथील महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत आहेत. त्याचे पडसाद सध्या पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे. त्यात भर म्हणून राहुरी तालुकाही मागे राहिला नाही.

तालुक्यातील दवणगाव येथील एक तीस वर्षीय महिला तक्रार नोंदवण्यासाठी राहुरी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या देवळाली प्रवरा पोलीस चौकीत गेली असता तेथे एका अज्ञात इसमाने फोन क्रमांक देत राहुरी येथील साहेबांना आपल्या तक्रारीविषयी सांगण्याचे सुचविल्यावरून तीने फोन केला असता दोन दिवसानंतर कार्यालयात येण्याचे सांगितले. दोन दिवसानंतर सदर महिला पोलिस ठाण्यात आली असता साहेब सेवानिवृत्त झाल्याचे समजले म्हणून तेथील उपनिरीक्षक नार्हेडा यांच्या कार्यालयात जात तीने आपल्या तक्रारीविषयी त्यांना सांगितले असता तुम्हाला मिस्टर नाही का, एकट्याच आल्या आहात का? अशी महिलेला खाजगी माहिती विचारून घेत मी तुमचे काम केले तर माझा काय फायदा? त्यावर महिलेने पन्नास हजार देण्याचे कबूल केले. त्यावर पैसे नकोत तुम्ही समजून घ्या त्यावर असे बोलू नका अशी विनंती केली त्यानंतर अर्ज टाईप करून ठाणे अंमलदाराकडे देण्याचे सांगितले. आठ दिवसानंतर अर्जाविषयी चौकशीसाठी फोन केला असता फोन करू नका कार्यालयात येवून भेटण्याचे सांगितले.

पोलिस ठाण्यासमोर महिला उभी असताना तिच्या फोनवर नार्हेडा यांनी ‘तु खूप छान दिसतेस’ असा व्हाटस ॲप मेसेज केला. महिलेने त्याकडे दुर्लक्ष करत पोलिस ठाण्यात अर्जाविषयी चौकशी करून निघून गेली. त्यानंतर नार्हेडा यांनी परत तु मला आवडतेस, माझ्याशी मैत्री करशील का त्यावर महिलेने रिप्लाय न दिल्याने प्लिज जानू रिप्लाय दे असे मेसेज केले. व्हाईस काॅल करत तुला मला भेटायचे आहे. त्यावर महिलेने हे शक्य नसल्याचे सांगत दिनांक ८ जुलै २०२३ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे नार्हेडा यांच्याविरोधात तक्रार अर्ज केला. त्यावर व्हाईस कॉल करत माझ्याविरूध्द तक्रार अर्ज का केला म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तु माझ्याकडे आली नाही तर तुझ्या घरी येत तुझ्या मुलासमोर मी काहीपण कृत्य करण्याची धमकी देत असत.

१७ जुलै रोजी सदर महिला कामानिमित्त राहुरी तहसीलदार कार्यालयात आली असता कागदपत्रे झेराॅक्स करण्यासाठी चिंचेच्या झाडाखाली उभी असताना तेथे नार्हेडा यांनी तीला माझ्या रूमवर यावे लागेल महिलेने नकार दिला असता रात्री तुझ्या घरी येवून तुझ्या मुलासमोर काहीपण करण्याची धमकी दिल्याने सदर महिला स्वत:च्या स्कुटीवरून त्यांच्या स्टेशन रस्त्यावरील रूमवर गेली असता त्यांनी जबरदस्तीने महिलेशी शारिरीक संबंध केले असल्याच्या फिर्यादी वरून राहुरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२)(अ), ५०६ अन्वये पोलिस उपनिरीक्षक सज्जनसिंग ना-हेडा यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे करीत आहेत.

पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक या जबाबदार पदावर कार्यरत असणारा अधिकारीच बलात्कारी ठरत असेल तर नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे. महिलांच्या बाबतीत जर काही अन्याय घडला आणि त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी महिला जात असेल त्या महिलेशी पोलीस असे वर्तन करणार असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर शासनाने महिलांना संरक्षण देण्याची भुमिका घेतलेली असेल नि ती जबाबदारी पोलिसांकरवी निभावली जात असताना हा रक्षणकर्ता जर भक्षण करत असेल तर यापेक्षा भयंकर काय म्हणावं. झालेल्या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button