अहमदनगर
अभ्यास दौऱ्यामुळे कृषी उद्योग उभारण्यास आत्मविश्वास मिळतो- संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे
राहुरी विद्यापीठ : अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमधील ज्ञानवृद्धी होते व शेतीपूरक उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्या दरम्यान यशस्वी कृषी उद्योजकांबरोबर चर्चा करावी व उत्पादनापासून विपणनापर्यंत ते कोणत्या गोष्टींचा अवलंब करतात, याचा बारकाईने अभ्यास करावा व त्या पद्धतीने आपल्या शेतीवर नवीन कृषी उद्योग उभारावे. शेतकऱ्यांच्या यशस्वी कृषी उद्योगांना भेटी दिल्यातर शेतकऱ्यांमध्ये कृषी उद्योग उभारण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो असे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ पिठाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे शेतकरी प्रथम कार्यक्रमांतर्गत कर्जत व जामखेड येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर अभ्यास दौरा कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा देताना विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे बोलत होते. याप्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ.सचिन सदाफळ, विजय शेडगे, राहुल कोऱ्हाळे, सचिन मगर उपस्थित होते. अभ्यास दौऱ्याचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. पंडित खर्डे यांनी केले.
या अभ्यास दौऱ्यामध्ये 11 महिला शेतकरी व तीस पुरुष शेतकरी सहभाग झाले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये कोळगावचे प्रशांत लगड यांचा रेशीम उत्पादन प्रकल्प, श्रीगोंद्याचे प्रकाश घनवट यांचा स्पिरिलूना उत्पादन प्रकल्प, लिंपण गावचे दीपक मुंडेकर यांचा शेळी प्रकल्प, तात्या लाखे यांचा मशरूम उत्पादन प्रकल्प, बाळासाहेब बाबर यांचा दूध उत्पादन प्रकल्प, कर्जत येथील बबन थोरात यांचा शेततळ्यातील मत्स्यपालन प्रकल्पास शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. या अभ्यास दौऱ्याच्या नियोजनासाठी विजय शेडगे, सचिन मगर आणि राहुल कोऱ्हाळे यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.