अहमदनगर

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – सरपंच शिरसाठ; पिठाच्या गिरणीचा शुभारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संस्था व संघटनेच्या पाठीशी दत्तनगर ग्रामपंचायत सक्षमपणे उभी राहिल व दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दत्तनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील शिरसाठ यांनी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अहमदनगर व मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार प्रकल्प अंतर्गत पिठाची गिरणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती करिता दत्तनगर ग्रामपंचायत मार्फत विशेष घरकुल योजना राबविण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात येईल.
अंत्योदय योजनेचा लाभ सर्व दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सोमवार दि.13 मार्च रोजी स्वस्त धान्य दुकानदार, ग्रामसेवक व तलाठी यांची तातडीची बैठक घेऊन समस्या निराकरण करण्यात येईल. दिव्यांगाकरिता स्वतंत्र रेशनकार्ड अंमलबजावणी करिता प्रयत्न केला जाईल, लवकरच 29 कोटी ची प्रस्तावित शुध्द पाणी पुरवठा योजना राबविण्यात येईल. दिव्यांगाच्या सामाजिक पुनर्वसनासाठी दीपस्तंभाचे यशस्वी कार्य अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील 25 वर्षांपासून चालू आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन खादी ग्रामोद्योगचे चेअरमन व दत्तनगर ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रेमचंद कुंकलोळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजी सभापती बाबासाहेब दिघे, भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष संदिप मगर, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड, मूकबधिर विद्यालय श्रीरामपूरचे मुख्याध्यापक संतोष जोशी, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. स्नेहा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, खजिनदार सौ. साधना चुडिवाल, दत्तनगर शाखाध्यक्ष सौ.विमलताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांगासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण सेस फंडातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी सहकार्य केले आहे. यानंतर देखील करण्यात येईल असे आश्वासन माजी जि.प सदस्य बाबासाहेब दिघे यांनी दिले. भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष संदिप मगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्था व संघटनेच्या कार्याची माहिती सविस्तर विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले. तर आभार मुश्ताकभाई तांबोळी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनार्दन पुजारी, रंगनाथ पुजारी, चंद्रकांत त्रिभुवन, सुनिल कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button