राजकीय

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम सामान्य उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार-सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : कृषी उत्पन्न बाजार समितीचा सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणारा निवडणुक कार्यक्रम चुकीचा असुन तो सर्वसामान्य शेतकरी उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना सुरेशराव लांबे पाटील म्हणाले की, हा निवडणूक कार्यक्रम शेतकरी व सामान्य उमेदवारांना या निवडणुकीपासून सरळ सरळ परावृत्त करण्याचा हेतु निवडणुक आयोग व प्रस्थापित पुढाऱ्यांसह सरकारचा आहे. विद्यमान सरकारने सर्व शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्यात येईल अशी वल्गना केली होती. परंतु शेतकऱ्यांना निवडणुकीत निव्वळ उभा राहण्याचा अधिकार दिला. त्यासाठी 5 हजार अनामत रक्कम, सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य हे सुचक अनुमोदक लागतील अशी अट घालुन शेतकऱ्यांना उभा राहण्याचा अधिकार देऊन प्रचार कालावधी अल्प करून शेतकऱ्यांची एक प्रकारे शासनाने थट्टाच केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुक सन- २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे –

अर्ज भरणे – दि. 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023; 8 दिवस, त्यात 3 दिवस सुट्या, अर्ज भरण्यासाठी फक्त 5 दिवस.

अर्ज छाननी – दि. 5 एप्रिल 2023.

अर्ज माघार – दि. 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023; अर्ज मागे घेण्यासाठी 15 दिवस मुदत आहे.

चिन्ह वाटप – दि. 21 एप्रिल 2023.

मतदान, दि. 28 एप्रिल 2023.

चिन्ह वाटपा पासून ते मतदान दिवसापर्यंत 8 दिवस आहेत. त्यातील चिन्ह वाटपाच्या दिवशी उमेदवाराला चिन्ह मिळते. त्यानंतर उमेदवाराला मतदारापर्यंत आपले नाव, अनुक्रम नंबर व चिन्ह ही ओळख पोहोचवण्यासाठी मत पत्रिका छपाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तो दिवस व रात्र त्यातच जातो. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रचार मतदानाच्या आधी 1 दिवस बंद होतो. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी फक्त 5 दिवस मिळणार आहेत.

अशा पध्दतीने अर्ज भरण्यापासुन ते मतदान दिवसा पर्यंत 33 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असुन यांमध्ये प्रचारासाठी फक्त 5 दिवस कालावधी मिळतो, अशा एकुण परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी वर्गातील उमेदवाराने सोसायटी मतदार संघातील 110 सोसायटीचे 1382 मतदार, व ग्रामपंचायत मतदार संघातील 83 गावातील 966 मतदारांपर्यंत आपले चिन्ह कसे पोहचवावे ? प्रचार कसा करावा ? मतदाराचे मतपरिवर्तन कसे करावे ? तरी निवडणुक आयोगाने प्रचारासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढ द्यावी. तसेच हा प्रश्न माजी मंत्री आ. बच्चुभाऊ कडु यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगून मुदत वाढ न मिळाल्यास सर्वसामान्य उमेदवाराचा प्रचाराअभावी पराभव झाल्यास आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी म्हटले आहे.

तरी सर्वसामान्य शेतकरी व सोसायटी, ग्रामपंचायत सदस्यांनी या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अर्ज भरावा व कष्टकरी शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button