मुख्यालयी राहत नसतानाही ग्रामीण भागातील अधिकार्यांचे घरभाडे मंजूर
नेवासा पंचायत समिती कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रावडे यांचे बेमुदत धरणे आंदोलन
नेवासा : मुख्यालयी राहत नसतानाही ग्रामीण भागातील अधिकार्यांचे घरभाडे मंजूर केल्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी विविध मागण्यांसंदर्भात नेवासा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणार्या ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक यांचे मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव अजूनही जमा झालेले नसताना तसेच मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव देण्यापूर्वीच त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी सन २०१९ पासून त्यांचे घरभाडे दर महिन्याला बेकायदेशीरपणे मंजूर केले असून त्या सर्वांवर कारवाई होण्यासाठी सोपान रावडे यांनी दि १५ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समितींना ईमेलद्वारे तक्रार केल्यानंतर दोषींवर कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नसल्याने संबंधित तक्रारीची चौकशी, तपासणी करून अहवालानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगोणी, ता. नेवासा येथील कार्यरत सर्व शिक्षक, मुख्याध्यापक हे अजूनही मुख्यालयी राहत नसताना ते सर्व नियुक्ती दिनांकापासून मुख्यालयी राहत असल्याचा खोट्या माहितीचा ग्रामसभेचा ठराव मंजूर करणार्यांची चौकशी व कारवाई होण्यासाठी वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या असून त्या तक्रारीनुसार संपूर्ण चौकशी न करता जाणीवपूर्वक अर्धवट चौकशी करून बनावट चौकशी अहवाल बनविले जात आहे. त्यामुळे राहिलेली चौकशी पूर्ण होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती, नेवासा येथे दि १२ डिसेंबर २०२२ रोजी लेखी तक्रारीनुसार राहिलेली चौकशी तातडीने पूर्ण करून शासनाची फसवणूक, भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करण्यात यावी.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कांगोणी ता. नेवासा येथील सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या दोन आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांची पूर्तता न करता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांनी त्या दोन वर्षांचे लेखा परीक्षण पूर्तता अहवाल पंचायत समिती नेवासा येथे देऊन शासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे या दोन वर्षांतील लेखा परीक्षण अहवालाची चौकशी, तपासणी होण्यासाठी वेळोवेळी तक्रारी केल्या असून त्या तक्रारीनुसार अजूनही पुर्णपणे चौकशी व तपासणी झालेली नसून त्याबाबत केलेल्या तक्रारीनुसार लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांच्या पूर्ततेबाबत तातडीने राहिलेली चौकशी व तपासणी करून भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करणार्यांवर कारवाई करण्यात यावी.
अशा विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणे आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे, त्रिंबक भदगले, प्रवीण पंडित, संभाजी माळवदे, शोभा पातारे, प्रवीण तिरोडकर, गणेश चौगुले, डॉ. करण घुले, गोरक्षनाथ कांबळे, सुरेशराव आढागळे, अशोकराव तांबे, दत्तात्रय निकम, मारुती निकम, तानाजी रावडे, बाबासाहेब रावडे आदींसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.