साहित्य व संस्कृती

डॉ. उपाध्ये, डॉ. काळे यांना साहित्य ज्योती पुरस्कार घोषित

'फिरत्या चाकावरती ' आणि 'गाव कुसातल्या गोष्टी ' या पुस्तकांना पुरस्कार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘फिरत्या चाकावरती’ आणि साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांच्या ‘गाव कुसातल्या गोष्टी’ या पुस्तकांना बीड जिल्ह्यातील कडा येथील साहित्य ज्योती काव्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाले असल्याची माहिती मंच संस्थापक अध्यक्ष प्रा.नागेश शेलार यांनी दिली.

डॉ.बाबुराव उपाध्ये 30 जून 2017 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सातारा, पुणे, कर्जत, श्रीरामपूर शाखेत 33 वर्षे अध्यापन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थी एम. फिल., 8 विद्यार्थी पीएच. डी. झाले.

डॉ. उपाध्ये यांची विविध वाड्मय प्रकारात 44 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, वाड्मयीन कार्याबद्दल 61 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ते 1978 पासून साहित्यविश्वात कार्यरत आहेत. डॉ. शिवाजी एकनाथ काळे हे नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील शेतकरी पूत्र असून ते 1981 पासून साहित्यक्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांनी संत ज्ञानदेवादी भावंडांच्या साहित्यसेवेवर पीएच. डी. संशोधन केले. ध्यासपर्व आत्मचरित्रावर एम. फिल. केले. ते नेट, सेट उत्तीर्ण आहेत.

एक प्रभावी गझलकार, ग्रामीण कथाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मुळा प्रवरा वीज संस्थेत ते अभियंता होते. 2011 पासून ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ‘गावकुसातल्या गोष्टी’ या विनोदी ग्रामीण कथासंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आसरा प्रकाशन द्वारे त्यांनी अनेकांची पुस्तके ना नफा ना तोटा या सेवाभावाने प्रकाशित केली आहेत. डॉ. उपाध्ये, डॉ. काळे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button