अहमदनगर

राहुरी तहसील कार्यालयातील महिलांबद्दल आपत्तीजनक वक्तव्य, महिला आयोगाकडे तक्रार

राहुरी | अशोक मंडलिक : राहुरी तहसील कार्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांच्याबद्दल आपत्तीजनक व बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी सदर महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे. बरोबरच पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे.

याबाबतीत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासाठी सरकारी कर्मचारी यांनी दि १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. संपाचे काळात कर्मचारी कामावर येत नव्हते. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला.

दरम्यान २१ मार्च रोजी सरकारी कर्मचारी यांचे आंदोलना विरोधात राहुरी परिसरातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्च्यानंतर तहसील कार्यालयाच्या पटांगणात झालेल्या सभेत २० ते ३० जणांचा जमाव होता, यात भाषणे झाली. यातील सहभागी ग्रामस्थांचा रोष विशेषतः महिला कर्मचारी यांचे विरोधात होता. परिसरातील प्रकाश देठे नामक व्यक्तीने महिलांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान होइल व समाजात त्यांची बदनामी होइल असे वक्तव्य केले.

‘तहसील कार्यालयात एक महिला आहे, तिचा मोठा ढाबा असून ती रोज संध्याकाळी बाटली घेऊन बसते’ अशाप्रकारे महिलांबद्दल आपत्तीजनक कथन करून समस्त तहसील कार्यालयातील महिलांचा अपमान केला व जनतेत आमच्याबद्दल रोष निर्माण होईल असे वक्तव्य केले. त्यामुळे समस्त महिला कर्मचारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच सदर महिला कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रकाश देठे नावाच्या व्यक्तीने भर सभेत केला आहे. त्यास इतर लोकांनी दुजोरा दिला आहे. तसेच तहसील कार्यालयातील महिलांच्या चारित्र्याविषयी बेताल वक्तव्य करून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले आहे.

याबाबत स्थानिक वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसिद्ध झाले व उलट-सुलट व बदनामीकारक चर्चा सुरू झाली आहे. जनतेचा दैनंदिन वावर असलेल्या शासकीय कार्यालयात प्रतिष्ठेने काम करण्याच्या महिलांच्या मानवी व मूलभूत हक्कावर गदा आलेली आहे. त्याचा परिणाम आमच्या आयुष्यावर होत कामाच्या ठिकाणी आमच्याबाबत दुषित वातावरण करण्याचा प्रयत्न करून महिला अधिकारी, कर्मचारी यांची बदनामी करणारे संबंधित मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश देठे यांचेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावर नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार पुनम दंडिले, अव्वल कारकून शैलेजा देवकाते, कांडेकर, मकासरे, पुरवठा निरिक्षक सगमोर, मंडल अधिकारी आघाव, सोनवणे, वाघमारे, खोसे, ननवरे, तलाठी आव्हाड, सरगैय्ये, अर्चना गायसमुद्रे, शिंदे, गडधे, राणे, धाडगे, रामफळे, कातोरे, बडे या महिला कर्मचारी यांच्या सह्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button