शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाची आमदार तनपुरे यांनी केली सोडवणूक
राहुरी | अशोक मंडलिक : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता या गावातील शेतकरी बांधवांचा २०११ पासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून मौजे वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्र “औद्योगिक क्षेत्राच्या ( नगर एम आय डी सी – Nagar MIDC ) विकासासाठी आवश्यकता नाही”, असे राज्य शासनाचे मत झाले आहे.
पोट-कलम (३) कलम २ खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र जनरल नलसिला १९०४ या संदर्भानुसार महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या या गोष्टी झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ व प्रकरण सहा दि. ३ मार्च २०२३ पासून जाहीर करीत आहे आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा ( नगर एम.आय.डी.सी. ) भाग राहणार नाही, असा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाचे अवर सचिव किरण जाधव यांनी काढल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
नगर तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील शेकडो शेतकरी बांधवांचे ४६१.७४ हेक्टर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी स्थळ पाहणी दौरा पार पडला होता. नगर तालुक्यातील या दोन्ही गावाचा हा अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याचा विषय होता. यासंदर्भात अनेक शेतकरी बांधव गेल्या १० ते ११ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. आग्रह धरत होते. शेतकरी बांधवांचा आग्रह आणि या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रश्नाला सरकार दरबारी नेऊन न्याय देण्याचा विडा उचलला. त्या अनुषंगाने दि. १५ जून २०२१ रोजी मंत्रालयात तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व विद्यमान सरकार मधील उद्योग मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला होता. सदर मंत्रांसमवेत झालेल्या बैठकीत सदर क्षेत्र “विना अधिसूचित” करण्यासाठी हाय पावर कमिटी नेमण्याचा निर्णय झाला. यास अनुसरून दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी हाय पावर कमिटीचा पाहणी दौरा पार पडला.
या निमित्तानं प्रतिक्रिया देताना सर्व शेतकरी बांधवांनी विश्वास प्रकट केला की, गेल्या दहा अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न झपाट्याने मार्गी लावण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पुढाकार कामी आला. अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या या अत्यंत गंभीर प्रश्नाची उकल होत असताना आमदार प्राजक्त तनपुरेंच्या प्रयत्नाने नवसंजीवनी मिळाल्याचं समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. परिसरातील नागरिकांकडून आमदार तनपुरे यांच्या प्रयत्नाचे कौतुक होताना दिसत आहे.
पिंपळगाव माळवी येथील रघुनाथ झिने, रामनाथ झिने, जालिंदर गुंड, मनोज लहारे, अप्पा जाधव, वडगाव गुप्ता येथील प्रकाश डोंगरे, जालिंदर डोंगरे, सुभाष ढेपे, कदम माऊली, शेवाळे सर, विजय डोंगरे आदींसह ग्रामस्थ आभार व्यक्त करत आहेत.