क्रीडा

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कीक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या संलग्न असलेल्या अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील रत्नाई कृषि महाविद्यालयात बी.एस्सी. कृषिच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या ॠषिकेश भाकरे या विद्यार्थ्यांने वीर बहादुर सिंग पुर्वांचल विद्यापीठ, जौनपूर, उत्तरप्रदेश येथे दि. 14 ते 17 मार्च, 2023 या कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कीक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक मिळाले आहे.

या यशाबद्दल कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव प्रमोद लहाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान व क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आयोजीत चंदिगड येथील पंजाब विद्यापीठात पार पडलेल्या रोविंग क्रीडा प्रकारात विद्यापीठाच्या केके वाघ कृषि संलग्न महाविद्यालय, नाशिक येथील कु. सृष्टी जाधव हीने सातवा व चि. अनिकेत कानमहाले याने आठवा क्रमांक प्राप्त केल्याने हे दोन्ही विद्यार्थी प्रथम आठमध्ये क्रमांक मिळविल्यामुळे खेलो इंडिया या आगामी होणार्या स्पर्धेकरीता ते पात्र ठरले आहेत.

त्याचप्रमाणे कृषि विज्ञान विद्यापीठ, बंगलोर येथे दि. 13 ते 17 मार्च, 2023 या कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय कृषि परिषद, नवी दिल्ली आयोजीत 21 व्या ॲग्री युनिफेस्ट या सांस्कृतिक स्पर्धेत भारतातील 60 कृषि विद्यापीठांच्या यादित महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संघाने वनपीस या एकांकिका स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच रांगोळीमध्ये बारामती येथील कृषि महाविद्यालयातील कु. भाविका केने या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

अखिल भारतीय कृषि परिषद आयोजीत सीसीएच विद्यापीठ, हिस्सार, हरीयाणा येथे दि. 20 ते 24 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत पार पडलेल्या ॲग्रीस्पोर्टस् 2023 या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या कबड्डी संघाला द्वितीय क्रमांक व मैदानी स्पर्धेत गोळा फेक क्रीडा प्रकारात चि. ज्ञानेश्वर बोडके याने चौथा क्रमांक मिळविला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे राजभवनाद्वारे आयोजीत क्रीडा महोत्सव-2022-23 या स्पर्धेमध्ये कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, तळसंदे येथील चि. ॠषिकेश बेल्हेकर या विद्यार्थ्याने ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकविले असून सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button