शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयातील दिव्यांग कार्यशाळेत रंगांची उधळण

राहुरी | बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, निर्भय कन्या उपक्रम व आरोग्य समिती आयोजित (विशेष विद्यार्थी) दिव्यांग कार्यशाळा अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे होते. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड यांनी केले. याप्रसंगी सहशिक्षक ज्ञानेश्वर लोखंडे, सतीश देठे, आलम सय्यद, आरोग्य समिती चेअरमन डॉ. राम तांबे, प्रा. बाळ सराफ, डॉ. शिवाजी पंडित, डॉ. रामदास बोरसे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. अश्विनी साळुंके, प्रा. माधुरी जेजुरकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेत बाभळेश्वर (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि अंध व कर्णबधिर विभागातील शंभर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
पहिल्या सत्रात संगमनेर पंचायत समितीचे विशेष शिक्षक मनोज काशिनाथ आहेर यांनी ‘अंध जगतातील प्रकाशवाटा” दिव्यांग व्यक्तीचे कायद्यातील हक्क व अधिकार याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात “तारुण्यातील आरोग्य जागर” याविषयी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संतोष आनंदा उबाळे यांनी विद्यार्थ्यांना तारुण्यातील बदल आणि आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी मनोगत व्यक्त केले.
दिव्यांग (विशेष विद्यार्थी) कार्यशाळेनंतर रंगपंचमीनिमित्त  रंगांची उधळण करत सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करत एकात्मतेचे दर्शन घडविले. ज्यांना रंगपंचमीचा रंग कोणता आहे हेच माहीत नाही, ते बघण्याची दृष्टीच नाही त्यांच्या जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला. आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश कान्हे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. लतिका पंडुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन, किशोर खेमनर, रमेश दगडू डोखे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button