शिक्षणवारी ज्ञान पंढरी
प्रवरा संस्थेने ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध करून दिली - अमोल आहेर
राहुरी | बाळकृष्ण भोसले : आज सामाजिक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. आपण वाचन संस्कृती विसरत चाललो आहोत. वाचनाला लेखनाची जोड दिल्यास अध्ययन घटक दीर्घकाळ लक्षात राहतो. विद्यार्थ्यांनी दिवास्वप्न न पाहता वास्तवामध्ये जगायला शिकले पाहिजे. स्पर्धा परीक्षेसाठी प्राथमिक पाठ्यक्रमाचा अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे. प्रवरा नदी तिराला प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. सध्यातरी स्पर्धा परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात होत आहे. ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांना प्रवरा संस्थेने स्पर्धा परीक्षांची मोफत संधी उपलब्ध करून दिली असून त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करणे गरजेचे असल्याचे मत लोणी येथील कर्मा करिअर अकॅडमीचे संचालक अमोल आहेर पाटील यांनी केले.
सात्रळ येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर समुपदेशन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी या विषयावर लोणी येथील कर्मा करिअर अकॅडमीचे संचालक अमोल आहेर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक डॉ. शैलेश कवडे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेले स्पर्धा परीक्षा विषयक विविध उपक्रम व सुविधांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रम समन्वयक डॉ. अमित वाघमारे यांनी प्रास्तावित केले. प्रा. आदिनाथ दरंदले यांनी आभार मानले. प्रा. दिप्ती आगरकर आणि डॉ. गंगाराम वडीतके यांनी सूत्रसंचालन केले.