गुन्हे वार्ता

शिक्षक कटारे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; शिक्षकांनी दिले तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निमगाव खैरी येथील विद्यालयातील सहशिक्षक अशोक भिमनाथ कटारे यांना बुधवार दि ३ ऑगस्ट २२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता निमगाव खैरी येथील विलासराव अप्पासाहेब शेजूळ यांनी विद्यालय आवारात विनाकारण मारहाण केली. त्याचा जाहीर निषेध म्हणून संस्थेच्या तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, विविध शिक्षक संघटना, टीडीएफ, प.महारष्ट्र मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य यांनी एकत्र येऊन श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना सदर इसमावर योग्य ती कारवाई करण्यासाठी संस्थेचे सहसचिव जयंतराव चौधरी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
बुधवार दि ३ ऑगस्ट रोजी विलास शेजूळ यांनी मद्यपान करून शिक्षक कटारे यांना या शाळेतून तुम्ही बदली करून घ्या, नाहीतर तुमचा काटा काढीन, बाहेरगाव येथून नोकरीला येतोस, अशी धमकी देऊन विलास शेजूळ यांनी कटारे यांना मारहाण केली. शिक्षक हा भावी पिढी घडविण्याचे काम करीत असताना त्याला कोणतेही संरक्षण नसते. सदर घटना विद्यालय आवारात घडली असून सदर शिक्षकाचा काही दोष नसून संबंधित शिक्षकाचे मानसिक, भावनिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचा प्रकार घडला असून सदर शेजूळ या इसमाचे कोणतेही पाल्य / विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत नाही. केवळ दमदाटी करून भीतीचे वातावरण निर्माण करणे, अरेरावी करणे या मागचा उद्देश असून सदर गावगुंडावर आपल्या पातळीवरून बंदोबस्त करावा असे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर गटशिक्षणाधिकारी श्रीरामपूर, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे संस्था सहसचिव जयंतराव चौधरी, जन. कौन्सिल सदस्य हंसराज आदिक, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद, सचिव सुनील म्हसे, सोसायटी माजी चेअरमन सुर्यकांत डावखर, प.महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ अध्यक्ष भागचंद औताडे, मच्छिंद्र जगताप, जयकर मगर, कैलास उंडे आदी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व शिक्षक सर्व शाळेवर रुजू झाले.

Related Articles

Back to top button