शासकीय योजना
कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचे दत्तकविधान
मुंबई : देशातील राज्ये आणि केंद्रप्रदेश सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ६४५ मुलांचे पालक कोविड आजाराने हिरावून नेले.कोविड महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन कारा अर्थात केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण दत्तक प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्यासाठी पीएपीएस अर्थात मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य पालकांची तात्पुरती नोंदणी, दत्तकविधानाची प्रकरणे प्राधान्याने हाती घेण्यासाठी सर्व महानिबंधकांना विनंती करणे तसेच दत्तक घेण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यासाठी आभासी न्यायालयांच्या कार्यवाहीची सुविधा पुरविणे यासारखे उपक्रम राबवीत आहे.कोविड-१९ महामारीच्या काळात, कोरोना आजारामुळे ज्या मुलांनी दोन्ही पालक अथवा जीवित असलेला पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक गमावले आहेत, त्या मुलांना मदत करण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी पीएम केयर्स बालक मदत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून, अशा मुलांचे शिक्षण आणि आरोग्य राखण्यासाठी पाठबळ पुरविले जात आहे आणि जेव्हा तो मुलगा अथवा मुलगी १८ वर्षांची होईल तेव्हा त्या प्रत्येकासाठी १० लाख रुपयांचा निधी जमा झालेला असेल. त्या मुलाला किंवा मुलीला वयाच्या १८ व्या वर्षापासून पुढील ५ वर्षे मासिक आर्थिक मदत अथवा विद्यावेतन देण्यासाठी हा निधी वापरला जाईल जेणेकरून त्या वयात पुढील शिक्षण घेण्याच्या कालावधीतील त्याच्या किंवा तिच्या व्यक्तिगत गरजा भागवायला मदत होईल. तो मुलगा अथवा मुलगी २३ वर्षांची झाल्यावर व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी एकरकमी स्वरुपात त्यांना देण्यात येईल. pmcaresforchildren.in. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या योजनेत भाग घेता येईल. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे पोर्टल १५ जुलै २०२१ ला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेतून मदत मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या एखाद्या लहान मुलाची माहिती असलेले नागरिक या पोर्टलच्या मदतीने त्या मुलाची माहिती प्रशासनाला कळवू शकतात.