कृषी

शेतीपंपाची सक्तीची वीज बील वसुली तात्काळ थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

राहुरी प्रतिनिधी : ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून शेतीपंपाची सुरू असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवून शेतीपंपाचे संपूर्ण वीज बील माफ करून शेतकर्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव उर्फ सूर्यभान लांबे पाटील यांच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षांपासुन संपुर्ण राज्यात अतिवृष्टी, गारपीट, वादळ व जागतिक संकट आलेल्या कोरोना महामारी मुळे सतत लॉकडाऊन यात शेतकरी संपुर्ण हैराण झाला असुन त्यात डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, पशुखाद्य व कृषीसेवा औषधे व वाढती मजुरी अशा एकुण भाव गगनाला भिडले असता शेतकरी यांची दोन वर्षांपासून झालेले नैसर्गिक नुकसान त्यात शासनाने कुठल्याही नुकसानीचे अनुदान शेतकर्यांना दिलेले नाही. यातुन शेतकरी आपल्या कुटूंबाचा कसाबसा सांभाळ करत शेती पिकवत आहे.
त्यात राहुरी तालुक्यातील ऊर्जा विभाग यांनी महावितरण अधिकारी यांनी वसुलीसाठी चालु असलेले ट्रान्सफार्मर बंद करून ब्राम्हणी सबस्टेशन कार्यक्षेत्रात मोकळ ओहोळ, ब्राम्हणी, चेडगांव तसेच राहुरी तालुक्यातील इतर गावांत सक्तीची विज बील वसुली सुरू करून शेतीमध्ये असलेली कांदा रोपे व कांदा पीक, ऊस, गहु, जनावरांचे घास, मका इतर चारा पीके पाणी असुनही जळुन चालले आहेत.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकर्यांना उध्दवस्त करण्याचे पाप राहुरी तालुक्यात होत असुन राहुरी विधानसभा मतदार संघातील कार्य क्षेत्रातील सर्व महावितरण अधिकारी यांना शेती पंपाचे ट्रान्सफार्मर बंद करू नये असे आदेश त्वरीत द्यावे व शेतकर्यांचे संपुर्ण विज बील माफ करावे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली शेतकर्यांची नुकसान भरपाई सरसकट हेक्टरी कमीत कमी २५ हजार रूपये सर्व शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी. अन्यथा शेतकर्यांना घेवून नाविलाजाने राहुरी मार्केट कमिटीसमोर नगर – मनमाड रोडवर सोमवार दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार सौ. दंडीले मॅडम यांनी स्विकारले.
निवेदनावर जगन्नाथ गायकवाड, नामदेव पवार, सचिन साळवे, शरद ढोकणे, विक्रम तांबे, अजित बानकर, गोरक्षनाथ म्हसे, नवनाथ गव्हाणे, बाळासाहेब क्षीरसागर, बाबासाहेब हापसे, बबन क्षीरसागर, सोमनाथ म्हसे, संदीप हापसे आदींच्या सह्या आहेत .

Related Articles

Back to top button