शिक्षणवारी ज्ञान पंढरी

नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करणे गरजेचे- अरुण भांगरे

अकोले येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन संपन्न

राहुरी | जावेद शेख : केंद्र शासनाने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण (एन.इ.पी. २०२०) हे शिक्षकांनी आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाच्या साह्याने, कृती संशोधनाच्या साह्याने, कुमारवयीन मुलांना समजून २१ व्या शतकातील उत्तम विद्यार्थी घडवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था संगमनेर व पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कन्या विद्या मंदिर येथील मुख्याध्यापिका पोखरकर उपस्थित होत्या.

राज्यात नवीन शैक्षणिक धोरण व आराखडा याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अकोले तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, मूल्यमापन, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग अशा विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतर्गत हस्तकला तयार केलेली ज्येष्ठ शिक्षिका नीता देशमुख यांच्या हस्ते वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांना भेट देण्यात आली.

या प्रशिक्षणात जिल्हा सुलभक बाबाजी पापळ, महेश पाडेकर, नीता देशमुख, सचिन वाकचौरे, सुनील लांघी, विनायक साळवे, मुकुंद सूर्यवंशी, हरीश आंबरे, गणपत धुमाळ, राधाकिशन लांडगे, सुहास भावसार, बळीराम फरगडे, मंगल आरोटे, सुयोग वाकचौरे, भारत जगधणी, प्रशांत जाधव, राजेंद्र भोर, चव्हाण आदी सुलभकांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींना नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख करून दिली. याप्रसंगी अकोले तालुक्यातील माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर यांनी तर आभार हरीश आंबरे यांनी मांडले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button