कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ‘ग्रंथा’ ग्रंथालयाचे उद्घाटन संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या ग्रंथा ग्रंथालयाचे उद्घाटन परभणी येथील मराठीतील प्रसिद्ध कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन परिसंवाद आणि संशोधन चर्चा करण्यात आली.
वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्तावित करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी प्राचार्य टी.ई. शेळके व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांच्या हस्ते कविवर्य इंद्रजित भालेराव यांचा शाल, सन्मानचिन्ह, पुस्तके, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामीण कथाकार, गझलकार, आसरा प्रकाशनचे संस्थापक डॉ.शिवाजी काळे यांनी वाचन संस्कृती आणि श्रीरामपूर साहित्यिक योगदान याविषयी माहिती दिली. कवयित्री संगीता फासाटे, यांनी साठोत्तरी ग्रामीण गेय कविता आणि कविवर्य इंद्रजित भालेराव यांचे वेगळेपण याविषयीचे संशोधन दिशा विशद केली. आपल्या पीएच.डी. वाटचालीची चर्चा केली. सौ.मंदाकिनी उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये यांनी नियोजन केले.
कविवर्य इंद्रजित भालेराव यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ग्रंथालयात हजारो महत्त्वाची पुस्तके आणि सुंदर ग्रंथालय कार्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, गुरुबंधू, मित्रवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शिरसगावसारख्या ग्रामीण भागात अशा वाचन चळवळीची गरज आहे, ती चालविण्यात डॉ. उपाध्ये व त्यांचा मित्रपरिवार यशस्वी झाले आहेत. आमचे गुरूवर्य डॉ. आनंद यादव, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले इत्यादिंच्या आठवणी संस्मरणीय असल्याचे सांगितले. या ग्रंथालयाचा विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, गृहिणी, सूज्ञ वाचक उपयोग करून घेतात हे फार महत्वाचे आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्राचार्य शेळके, डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळे यांनी मनोगतातून कविवर्य इंद्रजित भालेराव यांचे मोठेपण व भेटीविषयी समाधान व्यक्त केले. निर्मिक उपाध्ये याने इंद्रजित भालेराव यांची तिसरीच्या बालभारती भाग चारमधील ‘दोस्त’ कविताविषयी संवाद केला. प्रत्यक्ष कवी आणि कविता यांचा अनुभव याविषयी अनेकांनी समाधान व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांनी इंद्रजित भालेराव व संतोष पेडगावकर यांच्याविषयी गौरवोद्गार व्यक्त करीत आभार मानून अनेक पुस्तके भेट दिली.