धार्मिक

निर्मलधाम आश्रम आरडगाव येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी श्री एकादश रूद्र पूजा

राहुरी : परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या आशीर्वादाने व श्री माताजींच्या चरणकमलांनी पावन अशा निर्मलधाम आश्रम आरडगाव, ता. राहुरी येथे दि लाईफ ईटर्नल ट्रस्ट, मुंबई संचलित, निर्मल धाम आश्रम आरडगाव यांचेतर्फे जगातील सहजयोगी बंधू आणि भगिनींना ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत असलेल्या एकादश रुद्र पूजेकरता आमंत्रित केले आहे. या पूजेसाठी परमपूज्य श्री माताजींच्या जेष्ठ कन्या श्रीमती कल्पनादिदी श्रीवास्तव यांची उपस्थिती राहणार आहे.

कल्पनादिदी श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते एप्रिल २०२२ मध्ये येथे भूमिपुजन आणि फेब्रुवारी २०२३ ला १००x१४५ फूट साईज पूजा हॉलचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर इतरही अनेक प्रकारची विकास कामे सुरू झालेली असुन काही पूर्ण झाली आहेत तर अजून कामे चालू आहेत. फेब्रु.२०२३ मध्ये पहिली “श्री एकादश रूद्र पुजा” येथे संपन्न झाली. दि लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबई हा श्री माताजींनी १९७२ मध्ये स्थापन केलेला पहिला सहजयोग ट्रस्ट आहे आणि निर्मलधाम, आरडगाव आश्रम हा त्यांच्याद्वारे स्थापन केलेल्या जगातील पहिल्या सहजयोग आश्रमांपैकी एक आहे.

आश्रमासाठी ७ एकर जागा श्री माताजींनी १९८७ मध्ये घेऊन आश्रमाची स्थापना केली असुन १९८८ मध्ये श्री माताजींचे सगुण स्वरूपात येथे पूजन झालेले आहे. श्री माताजींनी हे ठिकाण आपल्या पूर्वजांचे स्थान असल्याचे वर्णन करून आपले “माहेरघर” असे या स्थानाचे वर्णन केलेले आहे. तसेच पुराण काळापासून ‘राहुरी’ स्थानाचे महत्व वारंवार आपल्या प्रवचनांमधून श्री माताजींनी विषद केले आहे. अमृतमंथनाचे नंतर फसवून अमृत मिळवणार्‍या राहु नावाच्या राक्षसाचा वध मुसळ या शस्त्राद्वारे देवीने याठिकाणी केला होता, म्हणून याचे नाव “राहुरी” आहे, असे श्री माताजी येथील इतिहासाबाबत सांगतात.

श्री माताजींचे पूर्वज जे शालिवाहन राजे यांचे येथेच राज्य होते व ते देवीचे भक्त असत. श्री माताजींनी २ फेब्रुवारी १९८२ मध्ये निर्मलधाम आश्रमापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसळवाडी येथील जगातील एकमेव श्री एकादश रुद्र ( म्हसोबा देवस्थान ) या स्थानाचा जागर केला व त्याचे महत्व सांगितले. सन १९७५ ते १९८८ या काळात राहुरीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आणि राहुरी कृषी विद्यापीठात श्री माताजींनी आत्मसाक्षात्काराचे कार्यक्रम व पूजा घेतलेल्या आहेत. त्याकाळात देखील परदेशी साधक श्री माताजींसोबत येथे स्व उत्थानासाठी येत असत व अजूनही ध्यान धारणेकरता आश्रमात येऊन रहात आहेत.

देशातील व जगातील सर्व सहजयोगी त्यांच्या सामूहिक उत्थानासाठी आरडगाव या पवित्र भूमीवर येतात आणि आत्मानंद अनुभवतात. भारत देश व जगातून येणाऱ्या सर्व सहजयोगी यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी व त्यांना सर्व सुविधा मिळाव्या म्हणून दि लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबईने या आश्रमाच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. आपल्या नगर जिल्ह्याकरता ही अभिमानाची व गौरवाची बाब आहे. या आश्रमाच्या पूणतेनंतर भविष्यात निश्चितच नगर जिल्ह्याची ख्याती विश्वात पोहचणार आहे व सर्व ठिकाणांहून साधक येथे हजेरी लावतील.

दरम्यान, फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिली श्री एकादश रूद्र पूजा आरडगाव येथे घेण्यात आली. त्यानंतर यावर्षी ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसर्‍यांदा श्री एकादश रूद्र पूजा करण्यात येत असून या पूजेसाठी भारताच्या विविध राज्यांतून सहजयोगी उपस्थित राहणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button