धार्मिक

अडबंगनाथ भूमीत प्रभू रामाच्या अश्रूंची तपशीळा हा प्राचीन चमत्कार – स्वामी अरुणनाथगिरी महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : या जगामध्ये मंदिरे अनेक आहे. ती बांधली गेली आहे. इथे काहीही नसताना सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने भव्य मंदिराची उभारणी केली. परंतु श्रीराम प्रभूच्या अश्रूंची तपशीळा ही येथे प्राचीन असून हा एक चमत्कार असल्याचे विचार श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी संस्थान येथे प्रवचनात भाविकांसमोर मांडले.

सालाबाद प्रमाणे सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने आणि स्वामी अरुणनाथगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित प्रवचनात महाराज बोलत होते. देव तिळी आला। गोडे गोड जीव धाला ।।१।। साधला हा पर्वकाळ। गेला अंतरीचा मळ ।।धृ।। पाप पुण्य गेले। एका स्नानेचि खुंटले ।।३।। तुका म्हणे वाणी।। शुध्द जनार्दन जनी ।। या अभंगाच्या वाणीवर महाराजांनी प्रवचन केले.

यावेळी बोलताना महाराज म्हणाले की, भक्तीचा गुळ ज्ञानाचा तीळ याच्या एकोप्यातून गोडवा निर्माण होऊन त्याला आकार व तो दिसायला सुंदर आकर्षक होतो. त्यासाठी प्रेम भक्ती महत्त्वाची आहे. आपण कितीही मोठे झालो, ज्ञानी झालो, तरी चालणार नाही. त्यासाठी साधू संत संगत त्यांची सेवा त्यांचे चरित्र आत्मसात करणे आज काळाची गरज आहे.

संत सेवा आणि भक्ती असेल तर मानवी जीवाला सुख, समाधान मिळते. अडबंगनाथ भूमी ही नाथांची भूमी असून येथे येण्यास पूर्वजन्मीचे भाग्य असावे लागते तर येणारे भाग्यवान आहे. त्या जीवाला पुण्य मिळते व पाप नष्ट होते. पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे अडबंगनाथ तपोभूमी ही नाथांची सर्वश्रेष्ठ भूमी आहे. या ठिकाणी अडबंगनाथांनी बारा वर्ष तपश्चर्या केली. माणिक नावाच्या शेतकऱ्याला गुरु गोरक्षनाथ यांची कृपा झाली म्हणून माणिक शेतकऱ्याचा अडबंगनाथ प्रकट झाले. सद्गुरू नारायणगिरी महाराजांची माझ्यावर कृपा झाल्याने मी अरुणचा अरुणनाथगिरी झालो. या भूमीत अडबंगनाथांची सेवा करण्यास संधी प्राप्त झाली हे मी माझे भाग्य समजतो.

प्रेम भक्ति देणारे या जगात संतच आहे. संसाराचे ताप नष्ट करण्याची ताकद साधुसंत देवांमध्ये आहे. मात्र, त्याग केल्याशिवाय मानवी जीवाला सुख समाधान मिळत नाही. जीवन जगत असताना आपण कर्म चांगले करा, यश हमखास आहे. त्यासाठी देव साधू संतांचे चरण धरा व त्यांचे सेवा करा असा उपदेश स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी यावेळी भाविकांना केला. खंडाळा येथील सुनंदा नगरकर परिवाराकडून भाविकांना भोजन देण्यात आले व महाराजांचे संत पूजन केले.

यावेळी विनेकरी आण्णासाहेब आसने, यशवंत हुरुळे, गंगाराम महाराज, येडू आप्पा पवार, वाबळे पाटील, आघाडे सर, ओमने सर, गोरक्षनाथ तिर्से, सुखदेव गुंजाळ, सोमनाथ औटी, गोरक्षनाथ साबदे, लक्ष्मण नाना आसने, पत्रकार संदिप आसने, विजय आसने, आदेश थोरात, लखन महाराज, धर्मनाथ महाराज, प्रेमनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज काकडे, गणेश गोपाळे, मनोज नगरकर, पत्रकार विठ्ठलराव आसने यांच्यासह भाविक भक्त, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button