अहमदनगर

शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या निर्णयाचा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र निषेध – जिल्हाध्यक्ष औताडे

ऊस पिकातून जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 जानेवारी 2024 च्या तातडीच्या परिपत्रका अन्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून दुष्काळी परिस्थिती बेकायदेशीर सक्तीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करून शेतीशी निगडित कर्जाच्या सक्तीच्या वसुलीस स्थगिती दिलेली आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी व जिल्हा बँकेने संगनमत करून सदर निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न करता सदर शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय धाब्यावर गुंडाळून सक्तीची वसुली करण्याचा निर्णय सह. साखर कारखान्याच्या माध्यमातून घेतला होता. सदर निर्णयाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने याबाबत विभागीय सहनिबंधक नाशिक यांचेकडे तक्रार करून सदर वसुली जा.क्र.विनी -1 कावी- 1970/अ.नगर जिसम /ऊस बिल /2023 अन्वये परिपत्रक दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी स्थगिती मिळवली होती. यानंतर सक्तीच्या वसुलीस स्थगिती असल्याचे जिल्हा बँकेने प्रसिद्धी पत्रक काढून सक्तीची वसुली स्थगित असल्याचे घोषित केले होते. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण -0 623/प्र. क्र.146 /18-स, 29 डिसेंबर 2023 अन्वये 1) खरीप 2023 च्या हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती. 2) खरीप 2023 मधील अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठण. 3)कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज वाटप असा निर्णय राज्य शासनाने व सहकार विभागाने घेतला आहे व तशा स्पष्ट बोध होतील अशा सूचना दिल्या. परंतु सदर निर्णयाची जिल्हा बँकेने व सहकारी साखर कारखान्यांनी प्रभावी अंमलबजावणी न करता ऊस उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करून सक्तीची वसुली करण्यासाठी परिपत्रक काढून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी राज्याचे सहकार आयुक्त, अनिल कवडे पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे भेट घेऊन जिल्हा बँकेच्या चुकीच्या वर्तवणुकी व कारभार विरोधात निवेदन देऊन सहकार आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, पशुवैद्यकीय जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना डॉ. दादासाहेब आदिक, श्रीरामपूर तालुका पशुवैद्यकीय शेतकरी संघटना डॉ.विकास नवले, शेतकरी संघटनेचे खंदे समर्थक अशोक कारखान्याचे माजी संचालक साहेबराव चोरमल आदी उपस्थित होते. शिष्टमंडळास सहकार आयुक्त यांनी येत्या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना तातडीने ईमेलद्वारे सूचना देऊन जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून करत असलेली सक्तीची वसुली थांबवण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कारखान्यांनी पैसे कपात केले त्यांचेही पैसे परत करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने कारखान्यांच्या संगनमताने 3000 कोटी रुपये कारखान्यांना कर्ज स्वरूपात वाटप केले आहे. शेती क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 4615 /- कोटी रुपये वाटप केले आहे. जिल्हा बँकेच्या एकूण ठेवी 9000 कोटीच्या आसपास आहे. यावरून दुष्काळी परिस्थितीत शेतीच्या कर्जाची वसुली थांबवल्यास जिल्हा बँक 31 मार्च अखेर अडचणीत येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने व कारखान्यांनी घेतलेले कर्ज भरत नसल्याने ठेवीवरील व्याज 31 मार्चनंतर कसे द्यायचे असाही प्रश्न लेखापरीक्षण अहवालावरून दिसून येत आहे. त्यामुळेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँक गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितरक्षणार्थ शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने निर्णय न घेता बिलातून वसुली करण्याचे धोरण अवलंबित आहे असेही शेतकरी संघटनेने सहकार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button