डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा ‘साहित्यशोध ‘जीवनप्रेरक- बाळूशास्त्री महाराज देशपांडे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्य म्हणजे जे समाजहित साधते ते लेखन होय. माणसाला उभारी देणारे, दुरितांचे तिमिर घालविणारे असे लेखन केले पाहिजे, यादृष्टीने डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा ‘साहित्यशोध’ ग्रन्थ जीवनप्रेरक असल्याचे मत टाकळी चौधरी येथील वेदशास्त्र संपन्न बाळूशास्त्री महाराज देशपांडे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील काळे साईकृपा रसवंती गृहाच्या प्रांगणात झालेल्या पुस्तक परिसंवाद प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कडा येथील वाहन, चालक, मालक संघर्ष ग्रुपचे राज्य सहसचिव सुभाषराव देशमुख होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, सत्कार करून मनोगतात सांगितले, ‘साहित्यशोध’ हॆ 122 पृष्ठांचे पुस्तक पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. ते डॉ. स्नेहल तावरे यांच्या साहित्य तपस्वी जीवनाला अर्पण केले आहे.
यामध्ये महानुभाव, वारकरी, ग्रामीण, दलित, अनुवाद, प्रसारमाध्यमे, शिक्षण, व्यक्ती आणि वाड्.मय यांचे संदर्भलेख आहेत. डॉ. स्नेहल तावरे यांनी साहित्याच्या वाटचालीचे शिलेदार ही वाचनीय प्रस्तावना लिहिली आहे, असे सांगून सुभाषराव देशमुख यांच्या चोपन्नव्या वाढदिवसाच्या सोहळ्यात पुस्तकाची प्रकाशनरुपी चर्चा आणि दखल घेतल्याबद्दल संयोजक सुमित देशमुख मित्रपरिवाराचे कौतुक केले. गणेशानंद उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये, सौ.अनिता देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
बाळू शास्त्री महाराज देशपांडे यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, डॉ. उपाध्ये हॆ रयत शिक्षण संस्थेतून 2017 लाच सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांची साहित्य निमिर्ती आणि साहित्यिक चळवळ सुरूच आहे, त्यांच्या ‘साहित्यशोध’ या पुस्तकाने मी भारावून गेलो आहे. गुणवत्ता आणि सौंदर्य असणारे हे पुस्तक नव्या संशोधकांना, वाचकांना दिशादर्शक ठरणारे आहे. सुभाषराव देशमुख यांनी साईकृपा प्रांगण व्यासपीठावर हा वाचन संस्कृती प्रतिष्ठित करणारा कार्यक्रम झाला, त्यामुळे अधिक वाचनाची गोडी वाढली असल्याचे सांगून पुस्तकाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन सौ.आरती उपाध्ये यांनी केले तर प्रसाद देशमुख यांनी आभार मानले.