कृषी

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाने काटेकोर शेतीसाठी दिले मोठे योगदान – संशोधन संचालक डॉ. गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : काटेकोर शेती करण्यासाठी गुगल अर्थ इंजिन, आयओटी तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, भौगोलिक प्रणाली व रिमोट सेन्सिंग हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान असून विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाने आतापर्यंत या विषयांवर बहुमूल्य असे संशोधन केलेले आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालयातील 19 विद्यार्थी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक येथे पाठविण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या बँकॉक येथील प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक तथा कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने,कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील कदम उपस्थित होते. यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील आरएस- जीआयएस विशेषज्ञ, कृषी अभियंता इंजि. मोहन झडे व एआयटी, बँकॉक येथील पायथॉन प्रोग्रामर इंजि. शशांक शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी इंजि. मोहन झडे यांनी रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीमचे घटक तसेच त्याचे महत्त्व, व्याप्ती व आधुनिक शेतीसाठी होणारे अनुप्रयोग तसेच गुगल अर्थ इंजिन म्हणजे काय व त्याचे महत्त्व व उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इंजि. शशांक शिंदे यांनी पायथॉन प्रोग्रामिंग भाषेचा थोडक्यात परिचय व महत्त्व सांगितले. पायथॉन भाषेचा व्यवहारिकदृष्ट्या कसा उपयोग केला जातो याविषयीचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. महानंद माने यांनी केले. डॉ. सुनील कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सह आयोजक सचिव म्हणून डॉ. सुनील कदम यांनी काम पाहिले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून कास्ट प्रकल्पात कार्यरत असलेले संशोधन सहयोगी श्रीमती कविता राजपूत व सागर मॅजिक यांनी काम पाहिले. यावेळी या प्रशिक्षणासाठी 30 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button