धार्मिक

पवित्र मारिया ख्रिस्त सभेतील सहभागीता – महागुरुस्वामी एडविन कोलासो

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील अमृत महोत्सवी यात्रेपूर्व सातवा नोव्हेना भक्तिभावात संपन्न झाला. त्यावेळी औरंगाबाद धर्मप्रांताचे महागुरुस्वामी एडविन कोलासो यांनी पवित्र मारियाच्या जीवनावर महिमा सांगताना म्हणाले की पवित्र मारिया स्वर्गात उभी राहून आपल्या सर्वांना येथे येण्यासाठी आमंत्रण करीत आहे. तिने आपले सर्व जीवन समर्पित केले होते. यात्रेला ७५ वर्षे पूर्ण झाली तो एक आनंदाचा क्षण आहे. तसेच भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव नुकताच झाला. सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी भारतासाठी कार्य करीत आहेत.

मतमाउलीमुळे पुण्यवान गोष्टी सर्वत्र घडल्या याची सर्वांना कल्पना आहे. म्हणून ऑगस्ट महिना अत्यंत आनंदाचा होता. एका परिषदेत २०० भारतीय बिशप यांच्या उपस्थितीत पवित्र मारियाच्या जीवनावर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात बायबलमध्ये असणारे उत्पत्तीपासून संदर्भ एकत्रित केले आहे. त्यात परमेश्वराने एक भविष्यवाणी केली की एक स्त्री पवित्र मारिया या जगात येईल व सैतानाचे डोके ठेचेल, ते पहिल्या पानावर आहे.

पवित्र मरिया ही आपल्यासाठी एक आदर्श आहे, आयकॉन आहे. एकमेव आदर्श आहे, तिच्यापुढे दुसरे आदर्श नाहीत. ख्रिस्तसभा सांगते ती जगातील काल्पनिक स्त्री नव्हती. तुमच्या माझ्या सारखीच या मातीत जन्मलेली स्त्री आहे. ती आली या जगात राहिली तिने आपले संपूर्ण जीवन या जगासाठी समर्पित केले. याचे भरपूर पुरावे आपल्या समोर आहेत. जे डोळ्याने पाहिले नाही, जे कानाने कधी ऐकले नाही, जे स्वप्नात कधीच पाहू शकत नाही असे जीवन देवाने आपल्यासाठी येशुव्दारे दिले आहे.

जगाचा तारणारा येशू आहे. त्याने आपल्यासाठी क्रुसावर मरण पत्करले. येशूच्या खांद्याला खांदा लावून पवित्र मारिया अगदी शेवटपर्यंत डोंगरापर्यंत सोबत राहिली. तिने योगदान दिले जगाच्या तारणासाठी, आज सुद्धा तिला करोडो लोक आपली आई मानत आहेत. तिची भक्ती करीत आहेत. तिचा सन्मान करतात. तिच्या पायाकडे येऊन आपली दु:खे, संकटे, आनंद तिच्या समोर व्यक्त करीत असतो.

७५ वर्षात येथे लाखो लोक येऊन गेले त्यांना पवित्र मारीयेचा स्पर्श झालेला आहे. म्हणून ते सर्व येथे श्रद्धेने भक्तीने येतात. बरेच आजार दूर झाले, मनोकामना पूर्ण झाल्या. आपल्या जीवनात तुमच्या माझ्या बहिणीच्या माझ्या आईच्या वडिलांच्या जीवनात जे होते ते पाहिल्यानंतर वाटते हे चमत्कार आहेत. त्याचे कारण पवित्र मारीयेच्या जवळ राहात आहोत. हे भक्तीचे परिणाम आहेत. हे चमत्कार लक्षात ठेवून पवित्र मारीयेची भक्ती करत राहू आणि पवित्र मारिया नक्कीच आपल्याला आवडेल.

या नोव्हेनात प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, संजय पंडित, संदीप जगताप आदी सहभागी होते. येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.दि १० व ११ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button