महाराष्ट्र

मराठा समाजाचे प्रश्न तातडीने सोडवा- अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

सोलापूर : सध्या सरकारच्या वतीने शिक्षक भरतीचे काम सुरू आहे. बिंदू नामावली व रोस्टर दुरुस्त करून खुल्या प्रवर्ग व ईडबलूएस( EWS ) प्रवर्गाला जागा मिळाव्यात या करीता मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना मराठा महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष संदीप भोरे, सरचिटणीस गणेश चव्हाण, भाजपा कुर्डूवाडी शहराध्यक्ष शंकर बागल, सोलापूर तालुका अध्यक्ष यशवंत मोहिते, माढा तालुकाध्यक्ष धनाजी गोडसे, बार्शी तालुकाध्यक्ष सुरज गव्हाणे, हनुमंत धर्मे, मंगेश पडवळकर, विनायक मोहिते आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, सन 2023 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीत खुल्या व EWS प्रवर्गाकरिता त्यांच्या आरक्षित टक्केवारीच्या प्रमाणापेक्षा अतिशय कमी जागा येत असल्या कारणाने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये बिंदू नामावली तपासणीचे काम चालू आहे. परंतु त्या तपासणीमध्ये खुल्या प्रवर्गातील बिंदूवर मागास प्रवर्गाच्या बिंदूचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे बिंदू नामावली मध्ये अनियमित्ता होत असल्यामुळे खुल्या व EWS प्रवर्गाच्या जागा अतिशय कमी येत आहेत. त्यामुळे त्या त्या प्रवर्गातील बिंदूना त्याच प्रवर्गात दाखवण्यात यावे. निवड प्रवर्ग उपलब्ध नसणे नियुक्ती आदेश उपलब्ध नसणे, जात पडताळणी दाखला उपलब्ध नसणे, EWS प्रवर्गाची कोणतीही भरती झालेली नसताना देखील अनेक जिल्हा परिषदांमध्ये EWS च्या बिंदूवर अगोदर वेगळ्या प्रवर्गात नियुक्त झालेल्या लोकांना दर्शविण्यात येणे. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दर्शविण्यात येत आहे.

वस्तीशाळा शिक्षकांची नियुक्ती देताना खुल्या प्रवर्गामध्ये दर्शविण्यात आलेले आहे. पुरावे नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखवण्यात येत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर MPSC ने जाहिरातीत सुधारणा करून SEBC TO EWS हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 मधील निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या 94 मराठा उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्तींचा प्रश्न गंभीर झालेला आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 मधील 94 SEBC to EWS मराठा उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावू असे राज्य शासनाने जाहीर केले होते. परंतु आठ महिन्यांनंतरही प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

मा.MAT ने 2 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेला निर्णय हा अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर ती पूर्वलक्षी अभावाने बदलता येणार नाही असा होता. परंतु या निर्णयाचा चुकीचा फटका सर्वच MPSC च्या इतर भरती प्रक्रियेला होताना दिसत आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा- 2019 (MES 19) मध्ये अंतिम निकाल जाहिर झाला नसल्याने या जाहिरातीला महावितरण (Vikas: Alase case) हे प्रकरण लागु होत नसल्याने MAT ने दिलेल्या निर्णयामुळे मराठा उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे. याबाबत राज्य शासन पातळीवर मार्ग काढून तसेच मा. न्यायालयाच्या पुढे ही बाब भक्कमपणे ” आणण्यासाठी राज्याचे मा. महाधिवक्ता व सिनिअर विधिज्ञ यांचे मार्फत तातडीने प्रयत्न करावेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर MPSC ने जाहिरातीत सुधारणा करून SEBC To EWS हा निर्णय घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक 2020 भरती प्रक्रियेतील 65 EWS प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडीचा प्रश्न प्रलंबित आहे.

PSI 2020 च्या परीक्षेमध्ये EWS- उमेदवारांनी परीक्षेची सर्व प्रक्रीया ( पूर्व परीक्षा ते मुलाखत) हो EWS प्रवर्गातून पूर्ण केली असताना न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत 65 EWS उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच संयुक्त जाहिरातीतील राज्य कर निरीक्षक (STI) व सहायक कक्ष अधिकारी (ASO) या पदांचा EWS सहित निकाल जाहीर करून त्यांना सरसकट नियुक्त्या सुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र अन्याय PSI च्याच EWS उमेदवारांवर झालेला आहे. हा अन्याय दूर करून त्यांच्या निवड याद्या जाहीर करून त्यांना तात्काळ दिलासा देण्यात यावा.

वरील सर्व विषयामध्ये राज्य सरकारने तात्काळ गंभीरतेने लक्ष घालुन दखल घ्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे देण्यात आला आहे.तरी वरील मागण्यांच्या बाबत आपल्या तसेच जिल्हा परिषद, विभागीय मागासवर्ग कक्ष तसेच राज्य शासन पातळीवर गंभीरतेने लक्ष घालून या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button