चोरीचा कंटेनर चोरांसहित ताब्यात; राहुरी पोलिस प्रशासनाची धडाकेबाज कामगिरी
राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील पिंप्री अवघड येथे चोरी करून आणलेला कंटेनर चोरांसहित ताब्यात घेण्यात आला आहे. एकुण २२,४३,४३२ रुपयांच्या मुद्देमालासहित चार जणांना राहुरी पोलिसांनी पकडले असून त्यातील एक आरोपी फरार झाला आहे.
कंटेनर क्रमांक एम एच-२३- ए क्यू १५७१ चे चालक विकास शिरसाठ हे कोल्हार येथून सकाळी चहा घेऊन निघाले असता काही चोरांनी कंटेनरला गाडी आडवी लावून चालकाच्या गळ्याला सुरा लावला. जीवे मारण्याची धमकी दिली तसेच चालका जवळील रक्कम व कंटेनर घेऊन फरार झाले. चोरी करून आणलेला कंटेनर चोरांनी पिंप्री अवघड येथील उड्डा पुलाजवळ आणला. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चोरांनी कंटेनर वेडा वाकडा चालवून रस्त्यावरिल नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. अनेकांनी कसाबसा आपला जीव वाचवला.
सदरची घटना ही गावांमध्ये समजताच गावातील तरुणांनी तेथे धाव घेतली. धमरूद्र प्रतिष्ठानचे युवक व गावातील अनेक तरुणांनी कंटेनर उभा करुन चालकास ताब्यात घेतले. काहीतरी गौडबंगाल या चालकाने केले असावे म्हणून त्यास विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. संशय अधिक बळवल्याने तरुणांनी या चोरांना धरून ठेवले होते. काही वेळाने गाडीचा मालक पोलिसांसहित घटनास्थळी हजर झाल्यावर हे चोर पळू लागले. पोलिस व तरुणांच्या सतर्कतेने पाठलाग करून या चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कंटेनर चोरणाऱ्या ऋषिकेश तांबे, विकास झिंजुर्डे, नितीन बोर्डे (रा. देसवंडी ), समीर शेख ( रा . पिंप्री अवघड ) व अरुण मोरे (रा . लोणी ) या आरोपींवर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अरुण मोरे हा फरार झाला आहे. तसेच या गुन्हात वापरण्यात आलेली बुलेट क्रमांक एम एच- १७ – सी टी – ४१८९ ही राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, स.पो.नि. राजू लोखंडे, पो.स. ई. सज्जन न-हेडा, पो.हे.कॉ. खेमनर यांनी केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे राहुरी तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.