राजकीय
माजी सैनिक काळे यांच्या जिद्दीला सलाम- शिवाजीराजे पालवे
नगर : कुठलाही राजकीय वारसा नसलेले भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक रावसाहेब काळे यांनी नुकतीच राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय लोकशाही पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब काळे यांचा जय हिंद फाउंडेशनच्या शिष्टमंडळाकडून नगर येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे, शिवाजी वेताळ, रामभाऊ कराळे, दत्ता वामन, बाबू काकडे, पोपटराव पाथरे, संतोष कराळे, अशोक कासार, सुभाष जाधव आदी उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी रावसाहेब काळे यांनी सांगितले की, मी एक माजी सैनिक असून गेल्या आठ दहा वर्षापासून जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु सत्तेशिवाय समस्या सोडवणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने राजकीय पार्टीची स्थापना केली असून यापुढे ही पार्टी सैनिक, शेतकरी तसेच देशातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शिवाजीराजे पालवे म्हणाले की, रावसाहेब काळे यांनी शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी शंभरहून अधिक आंदोलने, उपोषणे केले आहे. माजी सैनिकानी जनसामान्यांच्या हितासाठी राजकीय पार्टी स्थापन करणे कौतुकास्पद गोष्ट आहे. सदैव देशाचे रक्षण करणारा सैनिक जनतेच्या हितासाठी राजकीय पार्टी स्थापन करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. सुरुवात छोटी असली तरी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातील आणि देशातील जनता नक्कीच पाठीशी भक्कमपणे उभे राहील असे प्रतिपादन वृक्ष मित्र माजी सैनिक शिवाजीराजे पालवे यांनी केले. सैनिकांमध्ये जिद्द असते, प्रामाणिकपणा असतो, त्यामुळे काळे यांनी लावलेले रोपटे येणाऱ्या काळात विशाल वटवृक्ष होईल यात शंका नाही. त्यांच्या माध्यमातून चांगलं काम घडावं अशा जय हिंद फाउंडेशनच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.