साहित्य व संस्कृती

अभ्यास आणि ध्यास असेल तर ग्रामीण मुली संशोधनात कर्तृत्व गाजवतात- डॉ.सौ. शीतल सुसरे 

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ग्रामीण भागातील मुली अधिक सक्षम असतात. त्यांनी अभ्यास आणि ध्यास यांच्या जोरावर आपल्या विषयात संशोधन करून देशसेवा केली पाहिजे. आपला वेळ आणि आयुष्याचा काळ सत्कारणी लावला पाहिजे. आपल्या हाती, माथी आणि पाठी जे आहे, त्यांचे मोल जाणून घ्यावे. जीवनाचे क्षण सोनेरी करावे. स्त्री म्हणून आपण कोठेही कमी नाहीत, नोकरी नसली तरी प्रामाणिकपणे संसार करताना चांगले संशोधन करता येते, असे विचार डॉ. सौ.शीतल सुसरे – गागरे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, पुणे येथील गागरे ग्रुप आणि पढेगाव येथील सुसरे परिवारातर्फे डॉ. सौ. शीतल सुसरे /गागरे यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले. त्यावेळी डॉ.सुसरे /गागरे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी पुणे येथील ग्रामीण साहित्यिक, प्रसिद्ध गझलकार प्रा. तुकाराम पाटील यांच्या साहित्यावर पीएच. डी. अभ्यास झाल्याबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये आणि प्राचार्य डॉ. गुंफाताई कोकाटे यांनी प्रारंभी पुणे विद्यापीठात सन्मान केला. त्यानंतर गागरे, सुसरे यांनी गौरव सोहळ्यात सन्मान केला. त्याप्रसंगी डॉ. शीतल सुसरे /गागरे बोलत होत्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब खंडेराव सुसरे यांची कन्या आणि राजेंद्र पंढरीनाथ गागरे यांच्या पत्नी डॉ. शीतल यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. तुकाराम पाटील यांच्या साहित्यावर पीएच. डी. पदवी प्राप्त करताना डॉ. शीतल गागरे यांना अनेक अडचणीवर मात करावी लागली. पती राजेंद्र गागरे यांची महाराष्ट्र, गुजरात राज्यात नोकरीसाठीची धावपळ असतानाही अतिशय आनंदाने आणि परिश्रमाने एकनिष्ठ राहून त्यांनी अभ्यास केला.

प्रथम त्यांनी प्रा. रायभान दवंगे यांच्या ‘प्रहार ‘कादंबरीवर डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली 2015 ला एम.फिल. पदवी मिळविली तर प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 2023 ला पीएच.डी. पदवी प्राप्त केली. शीतल सुसरे यांच्या रूपाने ही संसारी, अभ्यासू गृहिणी आजच्या संसारी स्त्रीसमोर एक आदर्श आहे, असे मत डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. कोकाटे यांनी सुसरे, गागरे परिवाराचे कौतुक केले, असे परिवार ज्या समाजात असतील तेथे ग्रामीण मुलींना घरी चांगला संसार करता करता छान अभ्यासही करता येतो, हे शीतल सुसरे यांच्या संशोधनातून दिसते.

प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, शीतल सुसरे यांनी माझ्या साहित्यावर दर्जेदार संशोधन केले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विषय सुचविला आणि प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी या विषयाला अधिक सकस न्याय देत मार्गदर्शन केले, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. शीतल सुसरे /गागरे म्हणाल्या, माझी आई मंगलताई सुसरे, वडील अण्णासाहेब सुसरे तसेच सासू सौ. सुनीताताई गागरे, सासरे पंढरीनाथ गागरे, पती राजेंद्र गागरे यांच्यासह कुटुंब पाठीशी असल्यामुळेच मी संशोधन करू शकले, असा परिवार प्रत्येक मुलीला लाभला तर त्याही नवे काम हाती घेतील. प्रा. तुकाराम पाटील यांनी दर्जेदार लेखन केले.

मार्गदर्शक प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे यांचे खूपच मौलिक मार्गदर्शन लाभले, बहिणी सौ. साधना राजेंद्र जवरे, सौ. संजीवनी सागर ठोंबरे, भाऊ आशुतोष सुसरे, दीर किरण गागरे, नणंद सुवर्णा नालबंदे, मुलगा शौर्य असे सर्वांचे सहकार्य, प्रेम, योगदान मला महत्वाचे वाटते, विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि नांदेडचे बहि:स्थ परीक्षक डॉ.माधवराव बसवंते यांनी सहकार्य केले, प्रेरक संदेश दिले. यापुढे आता संशोधनाचे पुस्तक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून डॉ. शीतल सुसरे /गागरे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button