टाकळीभान उपबाजार आवारात मोकळा कांदा मार्केटचा शुभारंभ – प्रभारी सचिव वाबळे
२५ मार्च रोजी शुभारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शेतकऱ्यांना गोणी मध्ये कांदा विक्री करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा विक्री खर्चामध्ये बचत व्हावी या हेतूने श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा मार्केटमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस मोकळा कांदा मार्केट लिलाव सुरू केले त्यास नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, राहुरी, नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मात्र आठवड्यातील केवळ तीनच दिवस मोकळा कांदा मार्केट न ठेवता इतर दिवस देखील मोकळा कांदा मार्केट सुरू करावे अशी मागणी तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्याने श्रीरामपूर बाजार समिती प्रशासनाने टाकळीभान उपबाजार आवारात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मोकळा कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दि.२५ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता मोकळा कांदा मार्केटचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे आणि प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे.
श्रीरामपूर बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे आणि बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत टाकळीभान उपबाजार आवारातील व्यापाऱ्यांची चर्चा करून टाकळीभान उपबाजार आवारामध्ये देखील शनिवार आणि रविवारी मोकळा कांदा मार्केट लिलाव सकाळी १०:०० वाजता आणि दुपारी ४:०० वाजता करण्याचा निर्णय घेतला असून शनिवार दि.२५ मार्च रोजी मोकळा कांदा मार्केटचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक दीपक नागरगोजे आणि प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोकळा कांदा मार्केटचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.
यावेळी शाखाधिकारी दिनकर पवार, सुभाष ब्राह्मणे, सिताराम जगताप, तांबे पाटील, बापूसाहेब नवले, दादाराम आघम, शनेश्वर दहे, आशिष पवार, रावसाहेब राशीनकर, किरण खंडागळे, गणेश चितळकर, विजय बिरदवडे, एकनाथ पटारे, ललित कोठारी, आप्पासाहेब हिवाळे, रोहित मिरीकर, पवण मिरीकर आदी कांदा व्यापारी यावेळी उपस्थित होते.