राजकीय

राहुरीतील शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा

राहुरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर राहुरीत शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब म्हसे, राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुका संघटक तनपुरे, भाजपचे जेष्ठ नेते प्रकाश पारख, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख किशोर मोरे, सतीश घुले, करण माळी, सागर ताकटे, राजेंद्र लबडे, प्रकाश खळेकर, विनायक बाठे, विक्रम गाढे, अविनाश क्षीरसागर आदींसह शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. निवडणूक आयोगाने अंतिम निकाल जाहीर करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ‘धनुष्यबाण’ ही निशाणी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय मानला जात आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून गेली दोन महिन्यांपासून कागदोपत्री पुरावे सादर करण्यात येत होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगान शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्ष चिन्हासोबतच शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. 
यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

Related Articles

Back to top button