औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यात व्यस्त- आ. रोहित पवार; बालानगर येथे भव्य शेतकरी संवाद मेळावा संपन्न

विलास लाटे | पैठण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी मागण्याच्या लायकीचे सुध्दा ठेवणार नाही असा ईशारा मंगळवारी (दि.१२) बालानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी केंद्राच्या दबावाखाली राज्याची अस्मिता गहाण ठेवणारे शिंदे फडणवीस यांचे सरकार बदला घेण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी आमदार रोहीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बालानगर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी माजी आमदार संजय वाघचौरे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, चेअरमन सचिन घायाळ, अनिल घोडके, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पीसे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर कापसे, रा.काॅ.युवक जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर, पी आर थोटे, सुरेश दुबाले, आबा मोरे, निवृत्ती बोबडे, डॉ गुलदाद पठाण, अज्जू कटयारे, अशोक सोनटक्के, मुनावर शेख, कैलास गोर्डे, संजीव कोरडे, राजू बोबडे, संजय निंबाळकर, निता परदेशी, शांताबाई नरवडे, जितू परदेशी, कल्याण भुकेले, ईरफान बागवान, हसनौद्दीन कटयारे, बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, असलम पठाण, अशोक सोनटक्के, अफरोज वड्डे, सचिन ज्योतिक, अशोक काळे, गणेश पवार, विवेक म्हस्के, जगदीश गोर्डे, अमोल तुपे, संतोष धापटे, पंकज चव्हाण, आकाश रावस, आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी दत्ता गोर्डे यांनी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाची जबाबदारी घ्या असे आवाहन रोहीत पवार यांना केले. पैठण तालुका अतिवृष्टी अनुदानातून वगळू नये यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती गोर्डे यांनी पवार यांच्याकडे यावेळी केली. पैठण तालुक्यातील बालानगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीकेचे आसूड ओढले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हताश झालेला असताना कृषी मंत्री रात्रीच्या अंधारात पिकाची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही असे जाहीर सांगतात. ही शेतकऱ्यांची थट्टामस्करी थांबवा असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस आम्ही घेऊन जाऊ असे आश्वासन यावेळी आमदार रोहीत पवार यांनी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची लाईट तोडू नका, दोन पैसे आल्यावर शेतकरी बील भरणारच आहे असे आवाहन पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव द्या अशा सूचना पवार यांनी संत एकनाथचे चेअरमन सचिन घायाळ यांना केल्या. यावेळी दत्ता गोर्डे, सचिन घायाळ, आप्पासाहेब निर्मळ, संजय वाघचौरे, यांचीही भाषणे झाली.
नाहीतर संत एकनाथ बंद पडला असता…
   दोन वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन झालेले असताना संत एकनाथ बंद पाडण्यासाठी राज्यसरकारवर दबाव टाकण्यात आला होता. तेव्हा दत्ता गोर्डे व सचिन घायाळ यांनी मला भेटून कारखाना वाचवण्यासाठी साद घातली, त्यांची तळमळ पाहून कारखाना बंद करण्याऐवजी मदत केली. नसता संत एकनाथ बंद पडला असता असेही रोहीत पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्ष विरोधात काम करणाऱ्यांचे कान टोचले…
    पक्षातील काही मंडळी निवडणुकीत स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतात या मुळे पक्षाचे नुकसान होते. अशा मंडळीवर आता आमचे लक्ष असून येथून पुढे त्यांनी वेळीच भानावर यावे असा रोखठोक ईशारा रोहीत पवार यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या गडबडीचा संदर्भ देत दिला. यानंतर व्यासपीठावरील एका पुढाऱ्याचा चेहरा उतरल्याने उपस्थितामध्ये त्या पुढाऱ्याच्या नावाची कुजबूज सुरू झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांंचा निषेध का केला नाही ?
   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल व भाजप प्रवक्त्याचा राज्याने निषेध नोंदवला. परंतु शिंदे गटातील एकाही मंत्र्याने याचा निषेध का नोंदविला नाही असा सवाल उपस्थित करत राज्याची अस्मिता गहाण ठेवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. केवळ वैयक्तीक हिताचा विचार करणारे सरकार असल्याने जी आर काढणे व विकास कामास स्थगिती देण्याचे काम सरकार करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button