कृषी

राहुरी कृषि विद्यापीठात भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या 86 व्या अधिवेशनाची सांगता

व्यासपीठावर भारतीय मृदा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. आर. विश्वास, संस्थेचे सचिव डॉ. के. के. बंडोपाध्याय, कोषाध्यक्ष डॉ. मीना व संयोजन समितीचे सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे आदी मान्यवर.
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय मृदविज्ञान संस्थेचे 86 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर, 2022 दरम्यान राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. भारतीय मृदा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी.आर. बिश्वास, संस्थेचे सचिव डॉ. के.के. बंडोपाध्याय, कोषाध्यक्ष डॉ. मीना व संयोजन समितीचे सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. चार दिवस चाललेल्या या अधिवेशनात जमीन, त्यांच्या समस्या, त्यावरील उपाय, कार्बन उत्सर्जन, सेंदिय, रासायनिक खते, नॅनो खते इत्यादी विविध विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदरील अधिवेशनासाठी भारतातून 500 हून अधिक मृदशास्त्रज्ञ उपस्थित होते.
सदरील अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सादरीकरणासाठी शास्त्रज्ञांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चार दिवस चाललेल्या या अधिवेशनात विविध शिफारशी करण्यात आल्या. शाश्वत शेती उत्पादनासाठी शेतकर्यांनी माती परिक्षण करणे आणि त्या आधारे खतांचा वापर करणे, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल सॉईल सायन्सचा वापर अनिवार्य झाला आहे. शेतीद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन, जमिनीची होणारी धूप कमी करण्याचा प्रयत्न, विविध उपाययोजना करण्याबाबत शिफारस करण्यात आली. त्याचबरोबर शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, सेंद्रिय खते, पिकांचे अवशेष, हिरवळीची खते, जैविक खते, इत्यादींचा मोठया प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे. खतनिर्मिती उद्योगाबाबत झालेल्या चर्चासत्रात, खतांची कार्यक्षमता वाढविण्याबाबत भर देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली. चार दिवस चाललेल्या या चर्चासत्राचे आयोजन करण्यासाठी विविध समित्या करण्यात आल्या होत्या. सदरील अधिवेशन उत्कृष्टरित्या पार पडल्याच्या भावना आलेल्या शास्त्रज्ञांनी समारोप प्रसंगी व्यक्त केल्या.
समारोप प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक, डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. सदरील अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन मिळाल्याचे संयोजन समितीचे सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी समारोप प्रसंगी सांगितले. संस्थेचे सचिव डॉ. बंडोपाध्याय यांनी आभार मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, सहसेक्रेटरी डॉ. रितू ठाकरे व कोषाध्यक्ष डॉ. श्रीगणेश शेळके व मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील सर्व शास्त्रज्ञांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button