अहमदनगर

संगमनेरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट; रस्त्यावर अपघाताची शक्यता-कानवडे

संगमनेर : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून यातून अनेक अपघात होत आहे. नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकोले रोड, बस स्थानक परिसरात, पिटीट कॉलेज परिसर, पंचायत समिती परिसरात मोकाट वासरे रस्त्यावर आढळत असून या ठिकाणी अशी वासरे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अनेक रस्त्यांवर गायी फिरत असतांना आढळतात. दहा-वीसच्या समूहाने फिरणारे हे प्राणी अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशातच एखादी गाय उधळली तर अनेक जनावरे सैरावैरा पळायला लागतात व त्यातूनच अनेकदा अपघातही घडत आहेत. शहरात मोकाट कुत्री तर प्रत्येक गल्लीत आढळत असून ते टोळीने सैरावैरा फिरताना दिसत असून समोरून कोणते वाहन येते की माणूस येतो याचे त्यांना भान नसते. परिणाम स्वरूप अनेक अपघात होत असून त्यातून अनेकांना आपल्या जीवाची किंमत चूकवावी लागु शकते.
कधीकधी याच गायी रस्त्यावरील कचरा, प्लास्टिक कॅरी बॅग खाऊन आजारी पडून त्यांचा जीव धोक्यात येतो. वाहनांची धडक बसून गायी-वासरे जखमी होतात. कधी कधी रात्रीच्या वेळी पाळत ठेवून गायी चोरून नेण्याचेही वादग्रस्त प्रकार घडलेले आहेत. नगरपालिकेने याआधी अशा फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा अनेकदा बंदोबस्त केला आहे तरी यात घट होताना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय असल्याचं शहर अध्यक्ष मनोहर जाधव यांनी म्हंटले. एकीकडे गायीला पवित्र गो-माता म्हणायचे व तरीही निष्काळजीपणा करून बेजबाबदारपणे गायींचा व नागरिकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही असे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी सांगितले.
यावेळी छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष गणेश थोरात, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संदिप राऊत, शहर अध्यक्ष मनोहर जाधव, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, रुपेश राऊत, महेश गोफने, ज्ञानेश्वर गोफने, ओंकार राऊत, गणेश काळे, शुभम खताळ, विशाल खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
  संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कायमच आमचे प्रश्न वेळोवेळी सोडवले आहेत. तरी येत्या 8 दिवसात मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास ही जनावरे नगरपालिका कार्यलयापुढे आणुन बांधु…
_ मनोहर जाधव; शहराध्यक्ष
 मुक्या जनांवरची होणारी हेळसांड तसेच होणारे अपघात लक्षात घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी.
_ गणेश थोरात; तालुकाध्यक्ष

Related Articles

Back to top button