औरंगाबाद

सायबर क्राईमच्या सतर्कने पाचोड येथील चिकन विक्रेत्याचे २९ हजार परतले

       
पाचोड येथील चिकन विक्रेत्याचे पैसे परत मिळवून दिल्याबद्दल सायबर क्राईम सेल पथकाचे पुष्पहार देऊन सत्कार करताना.(छायाःविजय चिडे, पाचोड


विजय चिडे /पाचोड : १४० किलो  चिकन विकत घेण्याचे  आमिष दाखवून  एका भामट्याने चिकन विक्रेत्यास आँनलाईन २९ हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार पाचोड ता.पैठण येथे गुरुवार ता. १९ आँगस्ट रोजी घडला होता. या घटनेची दखल घेत सायबर क्राईमच्या पोलीसांनी मोठ्या सतर्कतेने चिकन विक्रेत्याचे गेलेले पैसे आठ दिवसातच परत मिळवून दिले. गेलेले पैसे परत मिळाल्याने चिकन विक्रेत्याने सायबर क्राईम सेलचे पुष्पहार देऊन आभार व्यक्त केले.
याबाबत अधिक  माहिती अशी की, पाचोड येथील चिकन विक्रेते मोबीन रहेमान कुरेशी वय (३१)यांना १९ आँगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. जयहिंद सर मी एक फौजी बोलत आहे. मला १४० किलो चिकन विकत घ्यायचे आहे. काय दराने देणार आहे अन् १४० किलोचे किती रुपये होतात ताबडतोब कळवा. मग चिकन विक्रेत्याने १४० प्रती किलो दराने १४० किलोचे २५ हजार २०० रुपये होतात. असे त्या फौजी व्यक्तीला सांगितले. तो लगेच राजी होऊन होय म्हटलां आणि त्यासाठी मी तुमच्या फोन-पेवर एक रुपये सेंड करतो.
एक रुपये आल्याची खाञी पटवण्यासाठी भामट्याने परत  चिकन विक्रेत्याला फोन करुन विचारले. तेव्हा चिकनवाल्याने हो सर आला आहे. मग विश्वास संपादन करुन मी एकूण वीस हजार रुपये तुमच्या खात्यावर पाठवतो असे म्हणून या फौजी नावाच्या भामट्या व्यक्तीने एकोणवीस हजाराचा मेसेज चिकन शॉप विक्रेत्याला   पाठवला आणि त्या मेसेजला एक वेळेस टच करण्यास सांगितले. तर तेवढ्यात याच चिकन शॉपवरती आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीचा फोन पे नंबर ही मागून त्या नंबर वरती दहा हजार पाठवतो. असे सांगून त्या व्यक्तीलाही एक रुपया टाकला तो आला की नाही याची विचारणा केली. आणि त्या व्यक्तीच्या नावावर ही दहा हजार रुपये पाठवल्याचे सांगितले व या दोन्ही मेसेजला एक वेळेस टच करा असे सांगितले. चिकन शॉप विक्रेत्याने दोन्ही मोबाईल वरील मेसेजला एक वेळेस स्पर्श केल्याबरोबरच काही मिनिटातच चिकन शॉप चालकाच्या खात्यावरील २९००० रुपये डीबेट झाले तसेच जो ग्राहक चिकन घेण्यासाठी आला होता. त्याच्याही खात्यावर दहा हजाराचा मेसेज पाठवण्यात आला होता. त्या मेसेजला ही स्पर्श करताच त्याच्या खात्यावरील ही दहा हजार रुपये या भामट्याने वळती करुन तब्बल दोघांच्या खात्यावरुन २९ हजारांचा डल्ला मारला.
चिकन विक्रेत्याने तात्काळ पाचोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली या घटनेचे गांभीर्य ओळखत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भागवान धांडे, पवन चव्हान यांनी तातडीने  सायबर क्राईम औरंगाबाद (ग्रामीण) यांच्याकडे हा गुन्हा दाखल केला. सायबर क्राईम पोलीसांनी चिकन विक्रेत्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. मग घडलेल्या घटनेचा बारकाईने तपास करुन आठ दिवसातच भामट्याने आँनलाईन गंडा घालून वळती केलेली २९ हजार रुपयाचा शोध लावत गेलेले पैसे मोठ्या चतुराईने परत मिळवण्यात यश मिळवून चिकन विक्रेत्याच्या हवाली केले. मेहनतीने कमावलेले पैसे परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करत चिकन विक्रेत्याने सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पो उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कर्मचारी  कैलास कामठे, संदीप वरपे, रवि लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, योगेश दारूनते, मुकेश वाघ, गजानन बनसोड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांचे धन्यवाद मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button